कानपूर: कानपूरच्या ऐतिहासिक कसोटीत टीम इंडियानं न्यूझीलंडचा 197 धावांनी धुव्वा उडवला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.

ग्रीनपार्क स्टेडियमवर अखेरच्या दिवशी भारताला विजयासाठी सहा विकेट्सची गरज होती. ल्यूक रॉन्की आणि मिचेल सॅन्टनर या न्यूझीलंडच्या फलंदाजांनी पाचव्या विकेटसाठी 102 धावांची झुंजार भागीदारी रचली. पण जाडेजानं रॉन्कीला बाद करून ही जोडी फोडली.

न्यूझीलंडचे बाकीचे फलंदाज फारसा संघर्ष न करता माघारी परतले. दुसऱ्या डावात टीम इंडियासाठी अश्विननं सहा, मोहम्मद शमीनं दोन तर रवींद्र जाडेजानं एक विकेट काढली.

या कसोटीच्या पहिल्या डावात भारतानं 318 तर न्यूझीलंडनं 262 धावा केल्या होत्या. मग भारतानं आपला दुसरा डाव 377 धावांवर घोषित करुन न्यूझीलंडला 434 धावांचं आव्हान दिलं होतं. पण किवी टीमचा डाव 236 धावांवरच कोसळला.


रवींद्र जाडेजा मॅन ऑफ दी मॅच

अष्टपैलू रवींद्र जाडेजा कानपूर कसोटीत भारताच्या विजयाचा नायक ठरला. जाडेजानं 44 चेंडूंमध्ये 42 धावांची खेळी केली होती. त्यामुळंच भारताला पहिल्या डावात सर्वबाद 318 धावांची मजल मारता आली. दुसऱ्या डावातही जाडेजानं नाबाद 50 धावा फटकावल्या होत्या. जाडेजानं पहिल्या डावात पाच विकेट्स काढून न्यूझीलंडला सर्वबाद 262 धावांवर रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. जाडेजानं दुसऱ्या डावात ल्यूक रॉन्की आणि मिचेल सॅन्टनर ही जोडी फोडून भारताला महत्त्वाचा ब्रेक थ्रू मिळवून दिला.

संबंधित बातमी


कानपूर कसोटीवर टीम इंडियाची मजबूत पकड, किवींची दमछाक