लंडन : इंग्लंडमधल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीत क्रिकेटरसिकांना भारत विरुद्ध पाकिस्तान अशी ड्रीम फायनल पाहायला मिळेल. विराट कोहलीच्या टीम इंडियानं बर्मिंगहॅमच्या उपांत्य सामन्यात बांगलादेशचा नऊ विकेट्सनी धुव्वा उडवून फायनलमध्ये धडक मारली.

या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी बांगलादेशला 50 षटकांत सात बाद 264 धावांत रोखून टीम इंडियाची निम्मी मोहीम फत्ते केली होती. मग रोहित शर्माच्या खणखणीत शतकानं भारताचा विजय आणखी सोपा केला. रोहितनं शिखर धवनच्या साथीनं 87 धावांची दमदार सलामी दिली. मग त्यानं आणि विराट कोहलीनं दुसऱ्या विकेटसाठी 178 धावांची अभेद्य भागीदारी रचून टीम इंडियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

त्याआधी, या सामन्यात टीम इंडियानं बांगलादेशला 50 षटकांत सात बाद 264 धावांत रोखलं. भारताच्या भुवनेश्वर कुमारनं सलामीचा सौम्य सरकार आणि शब्बीर रहमानला स्वस्तात माघारी धाडलं. पण तमिम इक्बाल आणि मुशफिकुर रहिम यांनी तिसऱ्या विकेटसाठी 123 धावांची भागीदारी रचून बांगलादेशच्या डावाला आकार दिला.

ही जोडी बांगलादेशला मोठी धावसंख्या उभारून देणार असं वाटत होतं. पण केदार जाधवच्या फिरकीनं सामन्याला पुन्हा कलाटणी दिली. त्यानं तमिम आणि मुशफिकुर यांच्या दोन बहुमोल विकेट्स काढून सामना पुन्हा भारताच्या बाजूनं झुकवला.