नागपूर : महाराष्ट्रभरात ज्यांना ज्यांना 100 टक्के गुण मिळाले आहेत त्या मुलांची नावं आतापर्यंत आपल्याला पाठही झाली असतील. पण त्या यशाहून काहीशी वेगळी आणि चौकटीबाहेरच्या यशाची कहाणी नागपुरातून समोर आली आहे. या विद्यार्थिनी टॉपर नसल्या, तरी त्यांच्या जिद्दीची, प्रेरणादायी यशाची कहाणी थक्क करणारी आहे.


नियतीला हरवत पाय रोवून उभं राहाणं म्हणजे काय हे या मुलींकडून शिकायला हवं. कारण ही कहाणी या तिघींच्या यशाची नाही, तर या तिघींच्या असामान्य लढ्याची आहे. नागपूरच्या करुणाश्रम वसतिगृहात
राहणाऱ्या या तिघी. दहावीच्या परीक्षेत शिवानीला 51 टक्के, निवेदिताला 45 टक्के तर पूर्वाला बारावीच्या
परीक्षेत 56 टक्के गुण मिळाले आहेत.

एकीकडे 100 टक्के गुण मिळवणाऱ्या मार्कशीटसमोर हे गुण कमी असतीलही पण या गुणांमागचा संघर्ष सोपा नाही. शिवानी अवघ्या तेराव्या वर्षी सामुहिक बलात्काराला बळी पडली. एकीकडे आई वडिल तिच्या बाजूने कोर्टात लढत होते तर दुसरीकडे तिला एका देहव्यवसायातल्या एजंटनं हेरलं होतं.

निवेदिता जिथे राहायची ती वस्तीच अशी होती. एकदा वस्तीवर धाड पडली आणि रेडमध्ये सापडलेल्या निवेदिताला वसतिगृहात आणलं गेलं.

पूर्वाला दहावीला 70 टक्के मिळाले. त्यामुळे पुढच्या शिक्षणासाठी तिला तालुक्याच्या ठिकाणी पाठवण्यात आलं. मात्र नशिबाचे फासे उलटे पडले. पूर्वाही देहविक्रीच्या व्यवसायात वाहवत गेली.

एकीकडे घरची गरिबी आणि दुसरीकडे या व्यवसायातून मिळणारा पैसा यामुळे तिघीही डोळेझाक करुन पुढे जात राहिल्या आणि यामुळेच अभ्यास नावाचा शब्द आयुष्याच्या पाटीवरून कधी पुसला गेला हे त्यांनाही कळलं नाही.

मनगटातल्या जोरावर त्यांनी आपलं यश इतकं परफेक्ट खेचून आणलं की त्यांच्या यशाला आत्मविश्वासाची झळाली मिळाली. आयुष्याच्या प्रवाहात वयामुळे, काळामुळे या मुलींची काही पावलं चुकीची पडली. कधी धडपडल्या कधी परिस्थितीला सामोऱ्या गेल्या. मात्र या मुलींचं मार्कशीट बोर्डाच्या निकालाच्या नेहमीच टॉपला असेल हे निश्चित.