मुंबई : दबंग-3 च्या दिग्दर्शनास अरबाज खाननं नकार दिल्याने, सलमान आता नव्या दिग्दर्शकाच्या शोधात आहे. सलमान आणि त्याचा भाऊ सोहेल खान आगामी ट्यूबलाईट सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यानिमित्त मंगळवारी पत्रकारांशी बोलताना सलमाननं ही माहिती दिली.
सलमान म्हणाला की, ''आम्ही दगंब-3 लवकरच सुरु करणार आहोत. याविषया त्यांनी (अरबाज)नं मला सांगितलं की, 'मी या सिनेमाचं दिग्दर्शन करणार नाही. केवळ याची निर्मिती करेन.' यावर मी म्हटलं की, 'ठिक आहे, आम्ही यासाठी एक चांगला दिग्दर्शक शोधू.''
यानंतर सलमानला त्याच्या आवडत्या दिग्दर्शकाबद्दल विचारले असता, त्यावर तो म्हणाला की, ''अरबाजला दिग्दर्शन करण्यात स्वारस्य नाही. त्यापेक्षा सोहेल उत्तम दिग्दर्शन करु शकतो. कारण त्यासाठी दिग्दर्शकाकडे संयम असणं गरजेचं असतं. सोहेलसोबत काम करताना, तुम्ही चुका सुधारु शकता. पण अरबाजसोबत काम करताना चुकांमुळे तो वैतागतो. आणि त्याचा रक्तदाब वाढतो.''
सिनेमा निवडीविषयी सलमान म्हणाला की, ''जर सिनेमाची पटकथा ऐकत असताना, तुम्ही स्वत: ला पटकथेतील मुख्य नायकाच्या भूमिकेत पाहू शकत नसाल, तर त्याची कथा कितीही चांगली असली, तरी तो सिनेमा करणं व्यर्थ आहे.''
सलमानचा आगामी सिनेमा भारत-चीन युद्धाच्या पार्श्वभूमीवर आहे. या सिनेमातील भारत-चीन युद्धाच्या पार्श्वभूमीवर त्याला विचारले असता, सलमान म्हणाला की, ''आम्ही या सिनेमात भारत-चीन युद्धाची पार्श्वभूमी दाखवली आहे. या सिनेमातून युद्ध जितक्या लवकर संपवता येईल, तितक्या लवकर संपवणं आवश्यक आहे. हे दाखवण्याचा आमचा मुख्य उद्देश आहे. कारण जेव्हा दोन देशात युद्ध होतात, त्यावेळी दोन्ही देशाचे सैनिक मारले जातात. आणि त्यांचे आई-वडील, मुलांना त्यांच्याशिवाय उर्वरित आयुष्य जगावं लागतं.''
सलमानचा ट्यूबलाईट सिनेमा 25 जूनला रिलीज होणार आहे. हा सिनेमा 1962 च्या भारत-चीन लढाईवर आधारित असल्याचं बोललं जातं.
संबंधित बातम्या
युद्ध करा म्हणणाऱ्यांच्या हातात बंदुका द्या, सलमानचा राजकारण्यांवर निशाणा