मुंबई : विंडीजविरुद्धच्या पहिल्या वन डे सामन्यासाठी भारतीय संघाची आज घोषणा करण्यात आली आहे. बीसीसीआयने ट्वीट करत भारतीय संघाच्या 12 खेळाडूंची लिस्ट जारी केली. आपल्या शानदार कामगिरीच्या जोरावर रिषभ पंत वन-डेत पदार्पण करणार आहे.


रिषभ पंत युवा यष्टिरक्षक असला तरी देखील सामन्यात महेंद्रसिंग धोनीच यष्टिरक्षण करणार आहे. भारत आणि विंडीजमध्ये पाच वन डे सामन्यांची मालिका असणार आहे. पहिला सामना 21 ऑक्टोबरला खेळवण्यात येईल. या मालिकेतील पहिल्या दोन वन डेसाठी 14 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा यापूर्वीच करण्यात आली होती. पण ऐनवेळी दुखापत झाल्यामुळे शार्दूल ठाकूरला या मालिकेला मुकावं लागणार आहे.


विंडिजविरुद्धच्या पहिल्या दोन वन डे सामन्यांसाठी भारतीय संघ

विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा (उपकर्णधार), अंबाती रायुडू, रिषभ पंत, महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक), रवींद्र जाडेजा, कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल, उमेश यादव, मोहम्मद शमी, खलील अहमद

भारत वि. वेस्ट इंडिज वन डे मालिका

पहिला वन डे – 21 ऑक्टोबर, गुवाहटी

दुसरा वन डे – 24 ऑक्टोबर, विशाखापट्टणम

तिसरा वन डे – 27 ऑक्टोबर, पुणे

चौथा वन डे – 29 ऑक्टोबर, मुंबई

पाचवा वन डे – 1 नोव्हेंबर, तिरुवअनंतपुरम

विंडिजविरुद्ध पाच सामन्यांची वन डे मालिका झाल्यानंतर 4 ते 11 नोव्हेंबरदरम्यान तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळवण्यात येईल. विंडिजविरुद्धची मालिका संपल्यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना होईल, जिथे 21 नोव्हेंबरपासून टी-20 मालिका, त्यानंतर कसोटी मालिका आणि नंतर वन डे मालिका होईल. 18 जानेवारी 2019 पर्यंत भारत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असेल, त्यानंतर लगेच 23 जानेवारीपासून न्यूझीलंड दौऱ्याची सुरुवात होईल.