वादानंतर बावनकुळेंनी गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांना बाहेर काढलं!
एबीपी माझा वेब टीम | 20 Oct 2018 01:19 PM (IST)
टेकेपार गावाच्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने काही निर्देश दिले आहेत. त्याला शासन बांधिल असल्याचं बावनकुळेंनी सांगितल्यावर गावकरी चांगलेच आक्रमक झाले.
नागपूर : राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त यांच्यात बैठकीत जोरदार वाद झाला. हा वाद इतका वाढला की, चंद्रशेखर बावनकुळे यांनी काही ग्रामस्थांना बैठकीतून बाहेर काढलं. नागपुरात आज बावनकुळे यांच्यासोबत गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांची बैठक झाली. या बैठकीत नागपूर जिल्ह्यातल्या टेकेपार गावातल्या ग्रामस्थांचा चंद्रशेखर बावनकुळेंसोबत वाद झाला. हा वाद इतका वाढला की बावनकुळेंनी काही ग्रामस्थांना बैठकीच्या बाहेर काढलं. टेकेपार गावाच्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने काही निर्देश दिले आहेत. त्याला शासन बांधिल असल्याचं बावनकुळेंनी सांगितल्यावर गावकरी चांगलेच आक्रमक झाले. गावकरी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते आणि मग बावनकुळेंनी काही गावकऱ्यांना बाहेर काढलं. प्रलंबित मागण्यांसाठी गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांनी कालपासून (19 ऑक्टोबर) थेट नागपूरच्या आमदार निवासाचाच ताबा घेतला आहे. आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरु आहे. संतप्त आंदोलनकांनी काल गच्चीवरुन पाण्याची टाकी खाली टाकली आणि दगडफेकही केली. सरकार मागण्या पूर्ण करत नाही, तोपर्यंत आंदोलक आमदार निवासातच राहतील अशी भूमिका बच्चू कडू यांनी घेतली आहे. यानंतर आज सरकारकडून आमदार निवासावर ताबा घेतलेल्या गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांना चर्चेसाठी बोलावणं आलं आहे. या चर्चेसाठी आमदार बच्चू कडू रवाना झाले आहेत. नागपूर, भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री तसंच दोन्ही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी बैठकीला उपस्थित राहणार आहेत.