नवी दिल्ली : विंडीज दौऱ्यात ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा वेगवान गोलंदाज नवदीप सैनीला शिस्तभंगाच्या कारवाईला सामोरं जावं लागलं आहे. विंडीजविरुद्धच्या पहिल्या ट्वेन्टी ट्वेन्टीत निकोलस पूरनला बाद केल्यानंतर आक्रमक हावभाव केल्याप्रकरणी आयसीसीकडून सैनीवर ही कारवाई करण्यात आली.
नवदीप सैनीच्या या वर्तवणुकीसाठी आणि आयसीसीचा नियम 2.5 नियमाचे उल्लंघन केल्यामुळे त्याच्या नावावर एक डिमेरिट गुण जमा करण्यात आला आहे. सैनीने त्या सामन्यात चार षटकांत अवघ्या 17 धावा देत तीन फलंदाजांना माघारी धाडलं होतं. त्याच्या या कामगिरीसाठी त्याला सामनाविराचा बहुमान मिळवला होता.
नवदीप सैनीवर मैदानातील अम्पायर नाइजेल डुगुइड आणि ग्रेगरी ब्रेथवेट यांच्याशिवाय तीसरे अम्पायर लेस्ली रीफर आणि चौथे अम्पायर पैट्रिक गस्टर्ड यांनी शिस्तभंगाचे आरोप लावले होते. त्यानंतर सैनीने आपल्या वरी आरोप मान्य केले आणि मॅच रेफरीने दिलेली शिक्षाही मान्य केली.
सैनीने आपली चूक मान्य केल्याने कोणतीही औपचारिक सुनवणी होणार नाही. पहिल्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने वेस्ट इंडिजवर 4 विकेटनं मात दिली. तर रविवारी दुसऱ्या टी-20 सामनाही जिंकून टी-20 सीरिजवर कब्जा केला. पावसामुळे डकवर्थ लुईस नियमानुसार भारताने 22 धावांनी हा सामना जिंकला. आता शेवटचा टी-20 सामना मंगळवारी होणार आहे.