केरळीय समाजाच्या ताब्यातील 362 चौरस मीटर क्षेत्रफळाची जागा काढून बाळासाहेबांच्या राष्ट्रीय स्मारकाला दिली जाणार आहे. त्या बदल्यात केरळीय महिला समाजाला प्रभादेवी येथील आयटी पार्कच्या जागेत 81 चौरस मीटरची जागा देऊन त्यांचं पुनर्वसन केलं जाणार आहे. अशारितीने बाळासाहेबांच्या स्मारकासाठी आणखी एक मोकळा भूखंड महापालिकेने ठाकरे कुटुंबियांच्या झोळीत टाकला आहे.
मुंबई महापालिकेने शिवाजी पार्क येथील महापौर निवासस्थानाची जागा बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकासाठी हस्तांतरीत करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार राष्ट्रीय स्मारक या सार्वजनिक न्यासाला महापौर निवासाची जागा 30 वर्षांच्या भाडेपट्ट्याने देण्यात आली आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर मार्गावरील नगर भू क्रमांक 501, 502 पैकी आणि नगर भू क्रमांक 1495 धारण करणाऱ्या महापौर निवासाची जागा आणि इतर वापरात असलेल्या सुमारे 11 हजार 551.01 चौरस मीटर क्षेत्रफळाची जागा शासनाने स्थापन केलेल्या बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक सार्वजनिक न्यासाला 1 रुपया प्रतिवर्षी नाममात्र दराने देण्यात आली आहे.
त्यानुसार 11 हजार 551.01 चौरस मीटर क्षेत्रफळाच्या जागेचा ताबा नोव्हेंबर 2018 रोजी न्यासाला देण्यात आला. याबाबतची कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करुन 23 जानेवारी 2019 रोजी त्याचे हस्तांतरण न्यास समितीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं.
आता केरळीय महिला समाजाच्या ताब्यात असलेला 362 चौ.मी. भूखंडही न्यासाला मिळाला आहे.