कोलंबो: चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेच्या खणखणीत नाबाद शतकांच्या जोरावार, भारताने श्रीलंकेविरुद्धच्या कोलंबो कसोटीत पहिल्या दिवसअखेर 3 बाद 344 धावा केल्या.
चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेनं झळकावलेल्या शतकांनी कोलंबो कसोटीत भारतीय डावाला पुन्हा मजबुती दिली. पुजारा आणि रहाणेनं वैयक्तिक शतकं झळकावताना, चौथ्या विकेटसाठी 211 धावांची अभेद्य भागीदारीही रचली. त्यामुळंच या कसोटीत टीम इंडियानं तीन बाद 133 धावांवरून, पहिल्या दिवसअखेर तीन बाद 344 अशी भक्कम स्थितीत मजल मारली. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला त्या वेळी, चेतेश्वर पुजारा 128 आणि अजिंक्य रहाणे 103 धावांवर खेळत होता.
सलामीच्या लोकेश राहुलनं झळकावलेल्या अर्धशतकानं भारताला पहिल्या दिवशी उपाहाराला एक बाद 101 अशी दमदार सुरुवात करून दिली होती. पण उपाहारानंतर भारताची तीन बाद 133 अशी घसरगुंडी उडाली. त्या परिस्थितीत पुजारा आणि रहाणेनं भारतीय डावाची सूत्रं आपल्या हाती घेतली आणि पहिल्या दिवसअखेर टीम इंडियाला तीन बाद 344 धावांची मजल मारून दिली. कोलंबो कसोटीचा पहिला दिवस भारतीय फलंदाजांनी गाजवला.
चेतेश्वर पुजारानं त्याच्या कारकीर्दीतलं तेरावं कसोटी शतक झळकावलं. त्यानं 225 चेंडूंत दहा चौकार आणि एका षटकारासह नाबाद 128 धावांची खेळी केली. अजिंक्य रहाणेनं नववं कसोटी शतक साजरं केलं. त्यानं 168 चेंडूंत बारा चौकारांसह नाबाद 103 धावांची खेळी उभारली. सलामीच्या लोकेश राहुलनं 82 चेंडूंत सात चौकारांसह 57 धावा फटकावल्या.
दरम्यान, तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील हा दुसरा सामना आहे. कोलंबोतील सिंघली स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर हा सामना खेळवला जात आहे.
IndvsSL - पुजारा, रहाणेची शतकं, दिवसअखेर भारत 3 बाद 344
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
03 Aug 2017 01:07 PM (IST)
चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेच्या खणखणीत नाबाद शतकांच्या जोरावार, भारताने श्रीलंकेविरुद्धच्या कोलंबो कसोटीत पहिल्या दिवसअखेर 3 बाद 344 धावा केल्या.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -