पाटणा : 'विवाहित किंवा अविवाहित' असा प्रश्न सर्वसामान्यपणे कर्मचाऱ्यांना भरतीवेळी फॉर्ममध्ये विचारला जातो. नोकरीशी त्याचा थेट संबंध नसला, तरी हा प्रश्न आक्षेपार्ह नसल्यामुळे त्याकडे डोळेझाक केली जाते. मात्र इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (IGIMS) ने थेट कर्मचाऱ्यांच्या कौमार्याविषयी विचारणा केली आहे.

बिहारमधील पाटणामध्ये असलेल्या 'आयजीआयएमएस'ने आपल्या कर्मचाऱ्यांना व्हर्जिनीटीविषयी घोषणा करण्यास सांगितलं आहे. मॅरेज डिक्लरेशन फॉर्ममध्ये नव्याने भरती होणाऱ्या डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफला हा सवाल विचारण्यात आला आहे.

इतकंच नाही, तर पुरुष कर्मचाऱ्यांना एकापेक्षा अधिक पत्नी असल्यास, तेही जाहीर करण्यास सांगितलं आहे. तर महिला कर्मचाऱ्यांनाही अजब प्रश्न विचारण्यात आला आहे. 'तुम्ही लग्न केलेल्या पुरुषाशी तुमच्या व्यतिरिक्त जीवंत किंवा मृत पत्नी आह का?' असा प्रश्न फॉर्ममध्ये आहे.

ही प्रश्नावली संस्थेच्या स्थापनेपासून म्हणजेच 1984 पासून असल्याची माहिती वैद्यकीय उपाधीक्षक डॉ. मनिष मंडल यांनी दिली आहे. दिल्लीच्या 'एआयआयएम'मध्येही अशाच प्रकारचे प्रश्न विचापले जात असल्याचा दावाही त्यांनी केला. कर्मचाऱ्यांनी चुकीचं आचरण टाळावं, यासाठी हे प्रश्न विचारल्याचं समर्थनही त्यांनी केलं.

'व्हर्जिनीटी' हा शब्द चुकीचा असल्याची कबुली डॉ. मंडल यांनी दिली. संस्थेचा संबंध कौमार्याशी नसून विवाहित आहात की नाही, याच्याशी आहे. त्यामुळे व्हर्जिनीटी ऐवजी सिंगल असा शब्द वापरायला हवा, असंही ते म्हणाले.