इंदूर : होळकर क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताने श्रीलंकेवर 7 गडी राखून मात केली आहे. या विजयासह भारताने तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने लाहिरु कुमाराच्या गोलंदाजीवर शानदार षटकार ठोकत टीम इंडियाला या सामन्यात विजय मिळवून दिला आहे.


नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या श्रीलंकेला निर्धारीत 20 षटकात 9 गड्यांच्या बदल्यात 142 धावांपर्यंत मजल मारता आली. भारताने हे आव्हान 15 चेंडू राखून पूर्ण केले.


143 धावांच आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या टीम इंडियाने 17.30 षटकात 3 फलंदाजांच्या मोबदल्यात 146 धावा फटकावल्या. भारताकडून के. एल. राहुलने 45, शिखर धवनने 32, श्रेयस अय्यरने 34 धावांची खेळी केली. विराट कोहलीने 30 धावा फटकावत भारताला विजय मिळवून दिला.


तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेच्या फलंदाजांना लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. श्रीलंकेकडून कुसल परेराने सर्वाधिक 34 धावांचे योगदान दिले. सलामीवीर गुणतिलका (20) आणि अविश्का फर्नांडो (22) यांनी सुरुवातीला संयमी खेळी करुन धावफलक हलता ठेवला होता. परंतु त्यांना मोठी भागिदारी करता आली नाही.


भारताकडून शार्दुल ठाकूरने 3, नवदीप सैनी-कुलदीप यादव या दोघांनी प्रत्येकी 2-2 तर जसप्रीत बुमराह आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी 1-1 बळी मिळवत श्रीलंकन फलंदाजांना डोकं वर काढण्याची संधी दिली नाही.