INDvsSA Women : भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये महिला एकदिवसीय मालिका सुरू आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजनं नवा इतिहास घडवला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10 हजार धावांचा टप्पा ओलांडणारी मिताली राज ही पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली आहे. जगात केवळ दोनच महिला क्रिकेटर्सला हा टप्पा पार करता आला आहे.  मिताली ही जगभरात केवळ दुसरी महिला क्रिकेटपटू ठरली आहे. याआधी इंग्लंडच्या शेरलोट एडवर्ड्सनं 10 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. एडवर्ड्सनं  10 हजार 273 धावा केल्या असून एडवर्ड्स निवृत्त झाली आहे. पण मिताली अजूनही खेळत असून आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा बहुमान देखील मिताली लवकरच मिळवेल अशी चिन्हे आहेत. 


 मितालीच्या या विक्रमानंतर  BCCI नं ट्वीट करून तिला शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच अनेक खेळाडूंनी आणि दिग्गजांनी देखील तिचं अभिनंदन केलं आहे. मितालीनं आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीमध्ये आत्तापर्यंत 310 सामने खेळले आहेत. 310 सामन्यात तिनं 10 हजार धावा पूर्ण केल्यात. 


1999 मध्ये आयर्लंडविरुद्धच्या सामन्याद्वारे मिताली राजनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. 10 हजार धावा पूर्ण करण्यासह मिताली क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक सामन्यांमध्ये कर्णधार राहिलेली महिला क्रिकेटपटू आहे. तसेच 200हून अधिक एकदिवसीय सामने खेळण्याचा विक्रम देखील तिच्या नावावर आहे.  सलग 111 एकदिवसीय सामन्यांमध्ये खेळण्याचा देखील विक्रम तिच्याच नावावर आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 6 हजार 938 धावांचा विक्रम तिच्या नावावर आहे.