रांची : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेदरम्यान रांची येथे तिसरा कसोटी सामना खेळवला जात आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताने तीन बाद 224 धावांची मजल मारली आहे. या कसोटीत पावसाच्या व्यत्ययामुळं पहिल्या दिवशी 58 षटकांचाच खेळ होऊ शकला. त्यात दक्षिण आफ्रिकेनं भारताची तीन बाद 39 अशी घसरगुंडी उडवली होती. परंतु सलामीवीर रोहित शर्मा आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे या मुंबईकरांनी तिसऱ्या विकेटसाठी 185 धावांची अभेद्य भागीदारी रचून भारताचा डाव सावरला.


रोहित शर्माने 164 चेंडूंत 14 चौकार आणि 4 षटकार ठोकून 117, तर अजिंक्य रहाणेने 135 चेंडूंत 11 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने नाबाद 83 धावांची खेळी केली. पहिल्या दिवसअखेर भारताने 3 बाद 224 धावांची मजल मारली आहे.

सामन्याच्या पहिल्या सत्रात यजमान भारतीय संघाने तीन विकेट गमावल्या होत्या. परंतु रोहित-अजिंक्यच्या जोडीने दुसऱ्या सत्रात डाव सावरला. दुसऱ्या सत्रात भारताने एकही विकेट गमावली नाही. रोहितने आज त्याच्या कसोटी कारकिर्दीतले सहावे शतक ठोकले. तर सुरु असलेल्या मालिकेतले रोहितचे हे तिसरे शतक आहे. एकाच मालिकेत तीन शतके ठोकणारा भारताचा तिसरा फलंदाज होण्याचा विक्रम रोहितने रचला आहे. याआधी माजी क्रिकेटर सुनील गावस्कर आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर या दोघांनी असा विक्रम केला आहे.

दरम्यान, आजच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी खूप चांगली गोलंदाजी केली. कगिसो रबाडाने 14 षटकात 54 धावा देत भारताचे दोन गडी बाद केले. तर अॅन्रिच नॉर्ट्जे याने 16 षटकात 50 धावा देत एक गडी बाद केला.

भारताच्या सुरुवातीच्या फळीतील फलंदाजांना फार वेळ मैदानात टिकता आले नाही. चेतेश्वर पुजाराला भोपळादेखील फोडता आला नाही. तर सलामीवीर मयांक अग्रवाल (10) आणि कर्णधार विराट (12) कोहलीलाही मोठी खेळी करता आली आहे.