विशाखापट्टणम : रोहित शर्मा आणि मयांक अगरवालच्या अभेद्य द्विशतकी भागीदारीमुळे टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या विशाखापट्टणम कसोटीचा पहिला दिवस गाजवला. पावसाच्या व्यत्ययामुळे चहापानानंतरचं पूर्ण सत्र वाया गेलं, त्यामुळे पंचांनी खेळ थांबवण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी टीम इंडियाने बिनबाद 202 धावांची मजल मारली होती. रोहित शर्मा 174 चेंडूत 12 चौकार आणि पाच षटकारांसह नाबाद 115 तर मयांक अगरवाल 11 चौकार आणि दोन षटकारांसह नाबाद 84 धावांवर खेळत आहे.

रोहित शर्माने सलामीचा फलंदाज म्हणून पहिल्याच कसोटी डावात शतक झळकावून, आपल्या शिरपेचात मानाचा नवा तुरा खोवला. रोहितचं कसोटी कारकीर्दीतलं हे चौथं शतक ठरलं. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या मालिकेत रोहित शर्माला फलंदाजीत बढती देण्याचा निर्णय भारतीय संघव्यवस्थापनाने घेतला होता. रोहितने तो निर्णय सार्थ ठरवताना कसोटीच्या पहिल्याच दिवशी नाबाद 115 धावांची खेळी केली.