भोसरी जमीन प्रकरण आणि दाऊदशी संभाषणाच्या कथित प्रकरणात विनाकारण आपल्यावर आरोप झाले चौकशीत काहीही आलं नाही. या घटनांमध्ये आपल्यावरील आरोप कोणी सिद्ध करून दाखविल्यास आपण राजकारणातून संन्यास घेऊ असं खडसे यांनी म्हटलं आहे. आपल्याला तिकीट मिळो अथवा न मिळो जनता आपल्या पाठीशी आहे, असे यावेळी खडसे म्हणाले. गेली चाळीस वर्ष जनतेने साथ दिल्यामुळेच आपण आज इथपर्यंत पोहोचलो असल्याने सांगत खडसे यांनी जनतेचे आभार मानले. पुढील काळात देखील साथ जनतेने द्यावी असं भावनिक देखील खडसे यांनी यावेळी केलं. यादीत नाव नसल्याने निराश झालेल्या खडसे म्हणाले की, चाळीस वर्ष आपण प्रामाणिकपणे काम करून आपल्याला का असं वागवलं गेलं, या बाबत मी माझ्या 'आकां'ना विचारणार आहे. माझा गुन्हा काय ते तरी सांगावं, असंही खडसे म्हणाले.
पहिले ज्यावेळी शिवसेना-भाजपचा मुख्यमंत्री व्हायचा त्यावेळी युतीचा मुख्यमंत्री अशी ओळख असायची मात्र आता 'आपला' मुख्यमंत्री पाच वर्षासाठी राहिला. या काळात सरकारमधील एकही मंत्री माझ्या नजरेला नजर देऊ शकला नाही, असेही एकनाथ खडसे म्हणाले. जे वाईट आहे त्यावर प्रहार केला. समोर कोण आहे त्याची कधीच चिंता केली नाही, असेही खडसे यावेळी म्हणाले.
वरिष्ठांना मी नक्की विचारणार की माझ्या विरोधात कुणी विष पसरवलं. वेळ पडल्यास मी तुमच्याशी देखील संवाद साधेल, अशा शब्दात खडसे यांनी सूचक इशारा देखील दिला आहे. मला, आता तुमच्या सहकार्याची गरज आहे आणि ते तुम्ही मला द्याल हा विश्वास आहे, असे भावनिक आव्हान देखील खडसे यांनी केले.
एकनाथ खडसे यांचं नाव पहिल्या यादीत न आल्याने लेवा पाटीदार समाजात तीव्र संताप
दरमयान, भाजपकडून जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे नाव न आल्याने मुक्ताईनगर मतदारसंघात भाजपा कार्यकर्ते तसेच लेवा पाटीदार समाजामध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. महाराष्ट्रामध्ये लेवा पाटीदार समाज मोठ्या प्रमाणात विखुरला गेला आहे. संपूर्ण लेवा पाटीदार समाज हा भाजपच्या पाठीशी उभा आहे. ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांना भाजपने जर उमेदवारी दिली नाही तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा भोरगाव लेवा पाटीदार समाजाचे कुटुंब नायक रमेश विठू पाटील यांनी भुसावळ येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिला आहे.
आमचा समाज नेहमी भाजपाला साथ देणारा आहे. म्हणून खडसे यांना जे तिकीट अजूनपर्यंत दिलेलं नाही ते न्यायपूर्वक आणि सन्मानपूर्वक द्यावं लागेल. पहिल्या यादीत खडसे यांना तिकीट न दिल्याने संपूर्ण समाजाला प्रचंड मनस्ताप झाला आहे, असेही रमेश विठू पाटील म्हणाले. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लेवा पाटीदार समाज हा मोठ्या संख्येत असल्याने लेवा पाटीदार समाज काय भूमिका घेतो याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.