सोलापूर : लेबर पार्टीच्या बशीर अहमद यांनी आज सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. परंतु उमेदवारी दाखल करण्यापूर्वी त्यांनी घोड्यावर बसून रॅली काढली. रॅलीदरम्यान ताशांचा गजर, नाचणारी कार्यकर्ते मंडळी आणि घोड्यावर बसलेले हे बशीर अहमद. हे दृश्य पाहून ही एखाद्या लग्नाची वारात असल्याचा लोकांचा समज झाला होता. परंतु ही निवडणुकीची रॅली होती.

विद्यमान आमदार प्रणिती शिंदे यांच्यामुळे सोलापूर मध्य हा मतदारसंघ आधीच चर्चेत आहे. त्यात आता या अनोख्या उमेदवारीमुळे मतदारसंघ अधिक चर्चेत आला आहे. बशीर अहमद यांचा हा राजेशाही थाट फक्त घोड्यावरील मिरवणुकीपुरता मर्यादित नाही. ते म्हणतात की, आमदार झाल्यावर थेट गृहमंत्री होऊन आतंकवाद्यांचा नायनाट करण्याचा मनसुबा आहे. तसेच फरार दहशतवादी दाऊद इब्राहिमला आठ दिवसांत अटक करुन भारतात आणण्याचा दावाही त्यांनी केला आहे.

बशीर अहमद यांनी मोठ्या थाटात मिरवणूक काढली खरी, मात्र ही मिरवणूक कायद्याच्या चौकटीत गुन्हा ठरण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने प्रचारात प्राण्यांचे प्रदर्शन आणि वापर करण्यास मनाई केली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत. त्यामुळे बशीर यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो.

या मिरवणुकीबाबत बशीर यांच्याकडे विचारणा केल्यास, ते म्हणाले की, मला डोळ्यांचा आणि मधुमेहाचा त्रास आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे मी चालू शकत नाही. त्यासाठी माझ्या कार्यकर्त्यांनी घोड्यावरून मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी मी पोलिसांकडे परवानगी मागितली होती, पोलिसांनी मला सकारात्मक प्रतिसादही दिला. त्यामुळे मी ही मिरवणूक काढली.

दरम्यान या मिरवणुकीबाबत पोलीस म्हणाले की, निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार निवडणुकांच्या प्रचारामध्ये प्राण्यांचा वापर करता येऊ शकत नाही. जर अशा प्रकारे कोणी प्राण्यांचा वापर करत असेल तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश आयोगातर्फे देण्यात आले आहेत. बशीर अहमद यांनी परवानगी मागितली होती. त्यानुसार आम्ही निवडणूक आयोगाकडे याची विचारणा केली होती. अशाप्रकारे प्राण्यांचा वापर करता येऊ शकत नाही, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिल्याने बशीर अहमद यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

राज्यभरात अर्ज भरण्याची लगबग - अर्ज किया है | ABP Majha