IND vs RSA 2nd Test : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेतील दुसरा सामना केपटाऊनच्या मैदानावर खेळवण्यात येणार आहे. टीम इंडियाने या सामन्यासाठी जोरदार सराव सुरु केलाय. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे भारतीय संघ मालिकेत 1-1 ने बरोबरी करण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे. दरम्यान, केपटाऊनच्या मैदानावर (Cape Town) भारताची कामगिरी सुमार राहिली आहे. टीम इंडियाला केपटाऊनच्या मैदानावर एकही सामना जिंकता आलेला नाही. 


केपटाऊनमध्ये 6 मधील 4 सामन्यात भारत पराभूत 


केपटाऊनच्या मैदानावर (Cape Town) भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 6 सामने खेळले आहेत. यातील 4 सामन्यांमध्ये टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर 2 अनिर्णयीत राहिले आहेत. केपटाऊनच्या मैदानावर मालिकेतील दुसरा सामना 3 जानेवारीपासून खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचे कडवे आव्हान असणार आहे. टीम इंडियाकडे विराट कोहली (Virat kohli), रोहित शर्मा (Rohit Sharma) यांच्यासारखे तगडे खेळाडू असूनही पहिल्या सामन्यात पराभव स्वीकारावा लागला होता. केएल राहुलने पहिल्या डावात शतक झळकावले होते. मात्र, तो दुसऱ्या डावात केवळ 4 धावा करत तंबूत परतला होता.  


1993 मध्ये खेळला होता केपटाऊनच्या मैदानावर पहिला कसोटी सामना


भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केपटाऊनच्या मैदानावर 1993 मध्ये पहिला कसोटी सामना खेळला होता. हा सामना अर्निणयीत राहिला होता. यानंतर 1997 मध्ये खेळवण्यात आलेल्या सामन्यात भारताला 282 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. शिवाय, 2007 मध्ये खेळवण्यात आलेल्या सामन्यातही दक्षिण आफ्रिकेने 5 गडी राखून विजय मिळवला होता. तर 2011 मध्ये खेळवण्यात आलेला सामना अनिर्णयीत राहिला होता. यानंतर 2018 आणि 2022 मध्ये झालेल्या सामन्यांमध्ये टीम इंडिया पराभूत झाली होती. आता पुन्हा एकदा केपटाऊनच्या मैदानावर भारत आणि दक्षिण आफ्रिका आमने-सामने असणार आहेत. 


टीम इंडिया इतिहास रचणार?


रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वात टीम इंडिया (Team India) पुन्हा एकदा केपटाऊनच्या मैदानावर उतरणार आहे. भारतीय संघाकडे इतिहास रचण्याची मोठी संधी आहे. 1993 पासूनचा इतिहास बदलण्याची संधी रोहित ब्रिगेडकडे असणार आहे. त्यामुळे भारतीय संघाच्या अंतिम 11 खेळाडूमध्ये मोठे बदल करण्यात येतील, असे देखील बोलले जात आहे. टीम इंडिया दुसऱ्या कसोटीत विजय मिळवून इतिहास रचणार की, द. आफ्रिका आपला विजयरथ कायम ठेवणार? हे पाहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Cricket Facts of 2023 : टीम इंडियाने वर्ल्डकप गमावल्याचे दु:ख आहेच, पण सरत्या वर्षात क्रिकेटमध्ये 5 घटना अशा घडल्या, त्याच आजवर कधीच घडल्या नाहीत!