Cricket Facts of 2023 : क्रिकेट जगतात 2023 मध्ये अनेक अनोखे पराक्रम घडले आहेत. भारतासह जगभरातील क्रिकेट संघ आणि क्रिकेटपटूंनी क्रिकेट जगतात असे काही विक्रम केले आहेत, जे 2023 पूर्वी कधीही पाहिले नव्हते. टीम इंडियाने वर्ल्डकपमध्ये अविस्मरणीत कामगिरी करूनही जेतेपद पटकावता न आल्याचे दु:ख नक्कीच चाहत्यांच्या मनात असेल यात शंका नाही. सरत्या वर्षात ऑस्ट्रेलिया संघ सर्वाधिक नशीबवान ठरला. आयपीएल लिलावातही ऑस्ट्रेलियन फलंदाज आणि गोलंदाजांचा बोलबाला राहिला. मिशेल स्टार्क सर्वाधिक महागडा गोलंदाज झाला. पॅट कमिन्स दोन नंबरचा महागडा गोलंदाज ठरला. 


अशाच काही 5 रंजक क्रिकेट फॅक्ट्सबद्दल जाणून घेऊया..


न्यूझीलंडचा एका धावेने ऐतिहासिक विजय 


2023 मध्ये वेलिंग्टन येथे इंग्लंड विरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात फॉलोऑननंतरही न्यूझीलंडने 1 धावाने सामना जिंकला. केवळ 1 धावांनी कसोटी सामना जिंकणारा न्यूझीलंड हा दुसरा संघ ठरला. यापूर्वी 1993 मध्ये अॅडलेडच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजने ऑस्ट्रेलियाचा 1 रन्सने पराभव केला होता.


बांगलादेशचा कसोटी इतिहासातील सर्वात मोठा विजय 


2023 मध्ये, बांगलादेश संघाने मीरपूर येथे खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात अफगाणिस्तानचा 546 धावांनी पराभव केला, जो धावांच्या बाबतीत 21 व्या शतकातील सर्वात मोठा विजय आहे. बांगलादेशापूर्वी 1934 मध्ये ऑस्ट्रेलियाने इंग्लंडच्या ओव्हल मैदानावर झालेल्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा 562 धावांनी पराभव केला होता. त्याच वेळी, 1928 मध्ये, इंग्लंड संघाने ब्रिस्बेन येथे झालेल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 675 धावांनी पराभव केला, जो आजपर्यंतचा सर्वात मोठा कसोटी विजय आहे.


दोन कर्णधारांनी 50 वा कसोटी सामना एकत्र खेळला


वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 च्या अंतिम सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना खेळला गेला. त्या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा होता, तर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स होता. या दोन्ही कर्णधारांचा हा 50 वा कसोटी सामना होता आणि कसोटी क्रिकेटच्या इतिहासात दोन संघांच्या कर्णधारांनी त्यांच्या कारकिर्दीतील 50 वा कसोटी सामना एकत्र खेळण्याची ही पहिलीच वेळ होती.


आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टाइम आउट 


आयसीसी एकदिवसीय विश्वचषकादरम्यान, बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यातील सामन्यादरम्यान, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रथमच, एखाद्या खेळाडूला टाइमआउट नियमाद्वारे बाद घोषित करण्यात आले. टाइम आउट होऊन विकेट गमावणारा श्रीलंकेचा अष्टपैलू अँजेलो मॅथ्यूज पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू ठरला. बांगलादेशचा कर्णधार शकीब अल हसनने नवा फलंदाज अँजेलो मॅथ्यूज 120 सेकंद चेंडू न खेळल्याने त्याला बाद करण्याचे आवाहन केले आणि पंचाने मॅथ्यूजला बाद घोषित केले.


विराट कोहलीचे एकदिवसीय क्रिकेटमधील 50 वे शतक


2023 मध्ये, विराट कोहली एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणारा फलंदाज बनला. माजी फलंदाज सचिन तेंडुलकरचा एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 49 शतके करणारा विक्रम मोडून 50 एकदिवसीय शतके करणारा तो जागतिक फलंदाज बनला. विराट कोहलीने एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात वनडेतील 50 वे शतक झळकावले.


इतर महत्वाच्या बातम्या