मुंबई : राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी घेतलेल्या एका निर्णयाला काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्थगित दिली होती. जितेंद्र आव्हाड यांनी टाटा कॅन्सर रुग्णालयाला म्हाडाच्या 100 सदनिका देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, या निर्णयाला स्थानिकांनी विरोध केला त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्णयाला स्थगिती दिली. त्यानंतर आज कॅन्सर रुग्णांच्या नातेवाईकांना बॉम्बे डाईंगमध्ये घरे मिळणार असल्याची घोषणा जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. तसेच परवानगी शिवाय मी कोणतंच काम करत नाही असंही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मान्यतेने टाटा कॅन्सर रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाईकांसाठी म्हाडामध्ये 100 खोल्या दिल्या होत्या. स्थानिक नागरिकांनी आक्षेप घेतला होता. आता मंत्रिमंडळ  बैठक सुरू होण्याच्या आधी जागा शोधायला सांगितल्या होत्या. त्यानंतर आता बॉम्बे डाईंगमध्ये या जागा दिल्या आहेत. एकाच इमारतीमध्ये ही जागा आहे, अशी माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. 


देशाच्या कानाकोपऱ्यातून कॅन्सरसारख्या दूर्धर आजाराशी लढणारे अनेकजण मुंबईतल्या टाटा मेमोरिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येतात. मुंबईत या पेशंटला उपचार मिळतात मात्र या पेशंटच्या नातेवाईकांना आसरा मिळत नाही. काही दिवसांपूर्वी  राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी टाटा कॅन्सर रुग्णालयाला ‘म्हाडा’च्या 100 सदनिका देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र या निर्णयाला स्थानिकांनी विरोध केला आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी निर्णयाला स्थगिती दिली.


टाटा हॉस्पिटल बाहेरच्या फुटपाथवरचं चित्र पाहून खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हाडातर्फे त्यांच्या निवासाची व्यवस्था करण्याबाबतची कल्पना मांडली होती.
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी तातडीने म्हाडाच्या अखत्यारितील लालाबागच्या सुखकर्ता संकुलात 100 घरे कॅन्सरग्रस्तांच्या नातेवाईकांना देण्याचा निर्णय घेतला होता. लालबागच्या स्थानिक रहिवाशांनी मात्र याला विरोध केला. सदनिका कॅन्सर रूग्णांच्या नातेवाईकांना राहण्यासाठी देण्याच्या निर्णयामुळे स्थानिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले. त्यामुळे या निर्णयाला तत्काळ स्थगिती द्यावी आणि याऐवजी भोईवाडा येथील म्हाडा गृहसंकुलालामधील तयार इमारतीमधील सदनिका टाटा रूग्णालयास द्यावी अशी मागणी अजय चौधरी यांनी केली होती. मुख्यमंत्र्यांकडे गाऱ्हाणं मांडल्यानंतर गृहनिर्माण मंत्र्यांच्या निर्णयाला मुख्यमंत्र्यांनीही स्थगिती दिली.