कानपूर: कानपूर कसोटीत भारताने कमबॅक केलं आहे, कारण कालच्या एक बाद 152 अशा मजबूत स्थितीतून, न्यूझीलंडचा संपूर्ण डाव 262 धावांत गुंडाळला आहे. त्यामुळे भारताला 56 धावांची आघाडी मिळाली .

भारताकडून रवींद्र जाडेजाने 5 तर अश्विनने 4 फलंदाजांना माघारी धाडत, न्यूझीलंडचा डाव गुंडाळण्यात मोलाचा वाटा उचलला.

रवींद्र जाडेजानं 73 धावांत पाच फलंदाजांना माघारी धाडलं. तर अश्विननं 93 धावांच्या मोबदल्यात चार विकेट्स काढल्या.

अश्विन आणि रवींद्र जाडेजानं प्रभावी मारा करुन कानपूर कसोटीच्या तिसऱ्या दिवशी टीम इंडियाला जबदरस्त कमबॅक करुन दिलं. न्यूझीलंडनं उपाहारापर्यंत पाच बाद 238 धावांची मजल मारली होती. मात्र त्यानंतर जाडेजा - अश्विन जोडीने अवघ्या 24 धावात न्यूझीलंडचा उर्वरीत अर्धा संघ माघारी धाडला.

न्यूझीलंडची अवस्था 5 बाद 255 अशी होती. मात्र त्यानंतर जाडेजाने एकाच षटकात तीन विकेट्स काढल्या. त्यामुळे किवींची स्थिती 8 बाद 258 अशी झाली. मग उर्वरीत 2 विकेट अश्विन आणि जाडेजने घेत न्यूझीलंडचा डाव 262 धावांत गुंडाळला. म्हणजेच अवघ्या 7 धावांत उर्वरीत निम्मा संघ तंबूत परतला.

एक बाद 152 अशा मजबूत स्थितीत न्यूझीलंडनं तिसऱ्या दिवसाची सुरुवात केली होती. पण अश्विन आणि जाडेजाच्या फिरकी जाळ्यात किवी फलंदाज अडकले. अश्विननं टॉम लॅथम आणि केन विल्यमसनला माघारी धाडलं. तर रविंद्र जाडेजानं रॉस टेलर आणि ल्यूक रॉन्चीला बाद केलं. लॅथमनं 58, तर विल्यमसननं 75 धावांची खेळी केली.