हिमालयातली एक सुंदर लोककथा आहे. पर्वतांच्या कुशीत एक ऋषी राहत होते. गुहेत राहायचं, चिंतन करायचं,



ज्ञानार्जन करायचं असा त्यांचा दिनक्रम वर्षानुवर्षे सुरू होता. कैक वर्षं अशी गेल्यावर त्यांना त्या बर्फाळ पर्वतांमध्ये काहीतरी अपुरं आहे असं वाटू लागलं. त्यांनी ईश्वराकडे प्रार्थना केली की, “सतत हे धवल हिम पाहून माझा मेंदू शिणला आहे. डोळ्यांना काही वेगळं दिसेल तर माझं औदासीन्य कमी होऊन मी पुन्हा माझं काम सुरू करू शकेन. कृपा करून इथं काहीतरी बदल घडवून आण. ”



ईश्वराने त्यांची प्रार्थना ऐकली. दुसरे दिवशी सकाळी ते जागे झाले तेच एका लहान मुलीच्या खळाळून हसण्याने. हिमशुभ्र वस्त्रं ल्यायलेली ती सुंदर मुलगी पाहून त्यांनी विचारलं, “तू कोण आहेस? ”

ती म्हणाली, “मी सृष्टीकन्या आहे. मला माझ्या आईने तुमच्याकडे पाठवलं आहे. माझं नाव आहे सुशोभिता! ”

“सुशोभिता!” ऋषी आनंदून म्हणाले, “तू आता इथेच राहणार आहेस का? ”

“होय बाबा. इथलं औदासीन्य दूर करण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवलेली आहे. ” ती म्हणाली, “आता तुम्ही मला हे पर्वत आणि इथली दऱ्याखोरी दाखवाल का?”

“जरूर. चल, आज आधी आपण पूर्वेकडच्या शिखरावर जाऊ.” असं म्हणून ऋषी तिला घेऊन गेले.

तिथून वळणांचा अवघड रस्ता असलेली एक खोल, गहिरी दरी दिसत होती. दोघंही त्या दरीत उतरले. सुशोभिता ऋषींना अनेक प्रश्न विचारत होती. उत्तर सापडलं की तिला खूप आनंद होई आणि ती खळाळून हसे. अनेक दिवसांचा प्रवास करून, नागमोडी वळणवाटांनी ते दरीच्या तळापर्यंत पोहोचले. तिथल्या सुंदर निळ्याशार सरोवराकाठी काही दिवस राहिले आणि मग परत दरीतून वर निघाले. तेव्हा ऋषींच्या ध्यानात आलं की खोरं लाखो रंगीबेरंगी फुलांनी भरून गेलं होतं. शेकडो प्रकारची नाजूक फुलं सर्वदूर पसरली होती आणि आपल्या रंगगंधाने त्यांनी केवळ ऋषींच्या मनातलंच नव्हे तर अवघ्या हिमालयातलं सगळं औदासीन्य पार पळवून लावलं होतं.

ही नक्कीच सुशोभिताची किमया असणार, हे जाणवून त्यांनी तिच्याकडे पाहिलं. ती पुन्हा खळाळून हसली आणि तिच्या हसण्यातून अजून काही सुंदर फुलं तिथं उमलली.



फुलांच्या राईतून शुभ्र पाण्याचे दूधझरे वाहत होते. त्यांनी चकित होऊन विचारलं, “हे झरे कुठून आले? ”

त्यांच्या प्रश्नाने सुशोभिताचे डोळे भरून आले. ती म्हणाली, “मला आईची आठवण आली की, रडू येतं. हे झरे माझ्या अश्रूंपासून बनलेले आहेत. ”

“सुशोभिता, वर्षातले दोन महिने फुलं फुलवलीस की बाकी काळ तू तुझ्या आईच्या कुशीत निवांत राहू शकशील. ही फुलांची दरी निर्माण करून तू पृथ्वीवर स्वर्ग आणला आहेस.” ऋषी म्हणाले.

सुशोभिता पुन्हा हसली. तिच्या हसण्याने अजून वेगळ्या रंगाकारांची फुलं खोऱ्यात उमलली.

तेव्हापासून आजपर्यंत हिमाचलात फिरताना कधी कुणाला उदास वाटत नाही.



फुलांचं खोरं म्हणून जो भाग प्रसिद्ध आहे, तो आज उत्तराखंड या राज्यात आहे. खोरं रानफुलांनी पूर्ण माखलेलं असतं ते वर्षातले खरे दोनच महिने. अकल्पित आकारांची, धुंद गडदगर्द रंगांची तीनशेंहून अधिक जातींची फुलं अभ्यासकांना आणि धाडसी पर्यटकांना देखील इथं खेचून आणतात. फुलांच्या खोऱ्यात एकदा जाऊन आलेल्या माणसाच्या सौंदर्याच्या सगळ्या कल्पनाच अंतर्बाह्य बदलून जातात. जे जे नैसर्गिक, सहज, उत्स्फूर्त ते ते सुंदर वाटायला लागतं. अगदी चालताना थकून सुजलेले आपले पायदेखील बेढब वाटेनासे होतात... जे आपल्याला सौंदर्यापर्यंत नेतं ते ते सारं सुंदरच असतं, हे नव्याने कळतं.

नजरबंदी करणारी थरारक हिमनदी, फिकट करडे, तपकिरी छटांचे दगड, त्याने उठून दिसणारा गवतपात्यांचा – पानांचा हिरवागार रंग, त्यातून खोल खळाळत वाहणारी नदी, पणजोबा – खापरपणजोबा वृक्ष, त्यांच्या अंगाखांद्यावर नांदणारे गाणारे पक्षी... नजर ठरतही नाही आणि फिरवावी वाटतही नाही. रंध्रारंध्राला स्पर्श करणारा तुफ्फान वारा कपड्यांचं ओझं हवंय कशाला असं कानात शीळ घालत विचारू लागतो आणि त्या जादूने मन गुंगायला लागतं. उन्हाच्या सोनसळ्या किरणांसोबत नाचावं वाटतं. धुकं पसरू लागलं की तर विरून विरघळून जावं वाटतं.



गवतावर पाठ टेकून पहुडलो आहोत, वर आकाशातून एक वाट चुकलेला ढग एकटाच फिरतोय, भवताली निळी, केशरी, लाल, जांभळी, पिवळी अगणित रंगछटांची लाखो फुलं हलके झोके घेताहेत. त्यात काही फुलछड्या ताठ मानेनं डौलात उभ्या आहेत. एवढ्यात कधी न पाहिलेला नाव माहीत नसलेले पक्षी निरागस निर्भयपणे हातावर अलगद उतरतो आणि निवांत चालत दंडापर्यंत येऊन गाणं गात थांबतो. श्वास रोखून ती शीळ कानात भरून घेतली की आता आयुष्यात या कानांनी दुसरं काही ऐकलं नाही तरी चालेल असं वाटतं. स्मरणातून सैगलच्या आवाजातलं एक गाणं उसळून वर येतं...

कौन बीराने मे देखेगा बहार

फूल जंगले मे खिले किन के लिये...

सारी दुनिया के है वो मेरे सिवा

मैने दुनिया छोडदी जिन के लिये...



घाबराघुबरा झालेला गाईड धापा टाकत जवळ येऊन थांबला, उठायला हात देत म्हणाला, “किती हाका मारल्या तुम्हाला. सगळे घाबरलेत. लवकर निघायला हवं. इथल्या पऱ्या माणसांना पळवून नेतात.”

हे पऱ्यांचं तर मला माहीत होतंच. आत्ताही पऱ्यांनी आभाळातून धुक्याचं जाळं फेकलंय. ते आता वेगाने खाली येऊन खोऱ्यात पसरेल. अवेळी थांबलं की माणसं पऱ्यांच्या जाळ्यात सापडतात. रंग कळेनासे होतात. आकार ओळखू येत नाही. घशातून शब्द फुटत नाही. अशी तहान लागते की फक्त दवबिंदू प्यावे वाटतात. पऱ्यांची भुरळ परवडत नाही. त्यांनी मध्यरात्री चांदण्यात जाळं वर खेचून घेतलं की त्यात अडकलेला माणूस पुन्हा पृथ्वीवर कधीच कुणाला दिसत नाही.

माझ्या अवतीभवती लाखो रंगीत पंख झुलत होते. त्या फुलांच्या पाकळ्या होत्या की पाखरांची पिसं की खऱ्याखुऱ्या पऱ्यांचे पंख... काहीच कळत नव्हतं. ओठ रानफुलांच्या स्पर्शाने मधाळ बनले होते. आकाशातला ढग माझ्या पापणीवर येऊन थांबला होता. काळ्या संगमरवरातून कोरल्यासारख्या दिसणाऱ्या कुणाची तरी आठवण सावलीसारखी माझ्या अस्तित्वावर पडलेली होती. मी जडावलेल्या डोळ्यांनी म्हटलं, “मला परत जायचंच नाहीये...”

सैगल गातच होता अजून...

वस्ल का दिन और इतका मुख्तसिर

दिन गिने जाते है इस दिन के लिये...

फूल जंगले मे खिले किन के लिये...



गाईड वेगाने खेचून मला फुलांच्या खोऱ्यातून वर घेऊन चालला होता. सोबतची माणसं हज्जार प्रश्न विचारत होती. खोऱ्यात लाखोलाख जांभळी फुलं फुलली होती. मऊ धुकं बुटांमधून, कपड्यांतून, त्वचेतून, हाडांमधून आत-आत घुसून मंद घुमत होतं. सुशोभिता खळाळून हसतच होती.

000

( छायाचित्रे : डॉ. अमिता कुलकर्णी, चित्र : कविता महाजन )

संबंधित ब्लॉग:

घुमक्कडी (7) : हुंकारकुपातले हरिण

घुमक्कडी (6) : वेगळ्या जागेवरून पाहताना

घुमक्कडी (5) : मिठाचा शुभ्र खारट खडा!

घुमक्कडी (4) साता प्रश्नांची कहाणी

घुमक्कडीः (3) न नींद नैना, ना अंग चैना

घुमक्कडी : (२) सीतेची तहान

घुमक्कडी : आभाळाचा कागद, समुद्राची शाई