मुंबई : पाच टी-20, तीन एकदिवसीय आणि दोन कसोटी सामन्यांच्या मालिका खेळण्यासाठी भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर गेला आहे. यापैकी पहिली टी-20 मालिका भारताने खिशात घातली आहे. अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या हॅमिल्टनच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात (बुधवारी) टीम इंडियाने सुपर ओव्हरमध्ये न्यूझीलंडवर सनसनाटी मात केली. या सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडसमोर 180 धावांचं आव्हान उभं केलं होतं. पण या आव्हानाचा पाठलाग करताना मर्यादित 20 षटकांत न्यूझीलंडच्या फलंदाजांना 179 धावा करता आल्या. त्यामुळे टाय झालेल्या सामन्याच्या निकालासाठी सुपर ओव्हर खेळवण्यात आली.

सुपर ओव्हरमध्ये न्यूझीलंडने दिलेलं 18 धावांचं आव्हान रोहित शर्मा आणि लोकेश राहुलने पूर्ण करुन भारताला मालिकाही जिंकून दिली. भारताचा न्यूझीलंडमधला हा आजवरचा पहिलाच टी-20 मालिका विजय ठरला आहे. पाच सामन्यांच्या मालिकेतले तीन सामने भारताने जिंकले आहेत. त्यामुळे उर्वरीत दोन सामने जिंकून भारत न्यूझीलंडला व्हाईट वॉश देण्याच्या मनसुब्याने पुढील दोन सामने खेळणार आहे. तर मालिका गमावली असली तरी लाज राखण्यासाठी उर्वरीत दोन सामने जिंकण्याचा न्यूझीलंडचा प्रयत्न असणार आहे.

सध्याचा टीम इंडियाचा फॉर्म पाहता पुढील दोन्ही सामन्यात टीम इंडियाचं पारडं जड असेल. मात्र आतापर्यंतची उभय संघांमधील सामन्यांची आकडेवारी पाहिली, अथवा वेलिंग्टनच्या मैदानावरील (या मैदानावर चौथा टी-20 सामना खेळवला जाणार आहे.) आकडेवारी पाहता चौथा सामना जिंकणं भारतासाठी सोपं नाही.

भारत आणि न्यूझीलंडमध्ये झालेल्या मागील पाच टी-20 सामन्यांपैकी भारताने चार सामने जिंकले आहेत, तर न्यूझीलंडला केवळ एकच सामना जिंकता आला आहे.

वेलिंग्टनच्या मैदानावरील आकडेवारी या मैदानावर सर्वात मोठी धावसंख्या उभारण्याचा विक्रम न्यूझीलंडच्या नावावर आहेत. किवींनी 2019 मध्ये वेलिंग्टनच्या मैदानावर भारताविरोधात खेळलेल्या सामन्यात 6 बाद 219 इतकी धावसंख्या उभारली होती. या मैदानावर वैयक्तिक सर्वात मोठी धावसंख्या उभारण्याचा विक्रम न्यूझीलंडच्याच टीम सैफर्टच्या नावावर आहे. 2019 मध्ये न्यूझीलंडने भारताविरोधात खेळलेल्या सामन्यात सैफर्टने 84 धावांची खेळी केली होती. वेलिंग्टनच्या मैदनावर न्यूझीलंडचा संघ आतापर्यंत एकूण 11 टी-20 सामने खेळला आहे. या अकरापैकी 8 सामने न्यूझीलंडने जिंकले आहेत. तर तीन सामने गमावले आहेत. या मैदानावर न्यूझीलंड आणि भारतामध्ये दोन टी-20 सामने खेळवण्यात आले आहेत. दोन्ही सामने न्यूझीलंडने जिंकले आहेत.

आमने-सामने (उभय संघांची परस्परविरोधातील कामगिरी)

न्यूझीलंड आकडेवारी भारत
14 सामने 14
8 विजय 6
0 सुपर ओव्हर विजय 1
57.14 विजयाची सरासरी 42.86

मागील पाच सामन्यांमधील भारताची कामगिरी

विरोधक संघ स्थळ दिनांक विजयाचं/पराभवाचं मार्जिन
न्यूझीलंड हॅमिल्टन 29 जानेवारी 2020 सुपरओव्हरमध्ये विजय
न्यूझीलंड ऑकलंड 26 जानेवारी 2020 7 विकेट राखून विजय
न्यूझीलंड ऑकलंड 24 जानेवारी 2020 6 विकेट राखून विजय
श्रीलंका पुणे 10 जानेवारी 2020 78 धावांच्या फरकाने विजय
श्रीलंका इंदूर 07 जानेवारी 2020 7 विकेट राखून विजय

मागील पाच सामन्यांमधील न्यूझीलंडची कामगिरी

विरोधक संघ स्थळ दिनांक विजयाचं/पराभवाचं मार्जिन
भारत हॅमिल्टन 29 जानेवारी 2020 सुपरओव्हरमध्ये पराभूत
भारत ऑकलंड 26 जानेवारी 2020 भारताचा 7 विकेट राखून विजय
भारत ऑकलंड 24 जानेवारी 2020 भारताचा 6 विकेट राखून विजय
इंग्लंड ऑकलंड 10 नोव्हेंबर 2019 सुपरओव्हरमध्ये पराभूत
इंग्लंड नेपियर 08 नोव्हेंबर 2019 इंग्लंडकडून 76 धावांनी पराभव