NZvsIND 3rd ODI : न्यूझीलंडने माऊंट मॉन्गानुईच्या तिसऱ्या वन डे सामन्यात भारताचा पाच विकेट्सनी धुव्वा उडवला. न्यूझीलंडने या विजयासह तीन सामन्यांची मालिका 3-0 अशी खिशात घातली. या सामन्यात भारताने दिलेल्या 297 धावांच्या आव्हानाचा न्यूझीलंडने नियोजनबद्ध पाठलाग केला. न्यूझीलंडकडून मार्टिन गप्टिलनं 66, हेन्री निकोलसनं 80 आणि कॉलिन डी ग्रॅण्डहोमनं नाबाद 58 धावांची खेळी उभारली. भारतानं न्यूझीलंड दौऱ्यातल्या पाच ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांच्या मालिकेत 5-0 असा निर्विवाद विजय मिळवला होता. न्यूझीलंडनं वन डे सामन्यांची मालिका मोठ्या फरकानं जिंकून त्याची परफेड केली आहे.
त्याआधी लोकेश राहुलचं शतक तिसऱ्या वन डेत भारतीय डावाचं वैशिष्ट्य ठरलं. भारताची धावसंख्या तीन बाद 62 असताना राहुल फलंदाजीला उतरला. त्याने 113 चेंडूंत 112 धावांची खेळी उभारली. श्रेयस अय्यरने 62 आणि मनीष पांडेने 42 धावांची खेळी करून त्याला छान साथ दिली. पृथ्वी शॉने सलामीला 40 धावांची खेळी केली. त्यामुळेच भारताला 50 षटकांत सात बाद 296 धावांची मजल मारता आली. पण फलंदाजांनी उभारलेल्या संरक्षणाचा भारतीय गोलंदाजांना लाभ उठवता आला नाही.