Commonwealth Games 2022 : कॉमनवेल्थ स्पर्धेत (Commonwealth Games 2022) भारतीय बॅडमिंटनपटूंनी कमाल कामगिरी केली, पण अखेरच्या सामन्यात मलेशियाविरुद्ध (India vs Malaysia) पराभव पत्करावा लागल्याने भारताला रौप्य पदकावर समाधान मानावं लागत आहे. पण या पदकामुळे भारताची पदकसंख्या 13 झाली आहे. अटीतटीच्या झालेल्या फायनलच्या सामन्यात भारत 3-1 च्या फरकाने पराभूत झाला. 





मलेशियाविरुद्धच्या सामन्यात सर्वात आधी पुरुष दुहेरीत भारताच्या सात्विक रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या प्रसिद्ध जोडीला एका चुरशीच्या सामन्यात पराभव पत्करावा लागला. आरोन चिया आणि वूयी यिक या जोडीने सात्विक आणि चिराग जोडीचा 18-21, 15-21 अशा फरकाने पराभव केला. ज्यामुळे मलेशियाने सामन्यात 1-0 ची आघाडी घेतली. त्यानंतर महिला एकेरीचा सामना पार पडला. यामध्ये भारताची अनुभवी बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने मलेशियाच्या जिन गोहला 22-20 आणि 21-17 अशा सरळ सेट्समध्ये मात देत विजय मिळवला आणि भारताला सामन्यात 1-1 ने बरोबरीत आणून ठेवलं.


त्यानंतर सामना पुरुष एकेरीचा किदम्बी श्रीकांत आणि योंग यांच्यात पार पडला. अत्यंत अटीतटीच्या या सामन्यात किदम्बी 19-21, 21-6, 16-21 च्या फरकाने पराभूत झाला. ज्यानंतर अखेरचा सामना ट्रेसा जॉली आणि गायत्री गोपिचंद या जोडीचा मुरलीथरन थिनाह आणि कूंक ली टॅन यांच्यात पार पडला. यामध्ये भारत 18-21, 17-21 अशा फरकाने पराभूत झाल्यामुळे सामना भारताने 3-1 ने गमावला. ज्यामुळे सुवर्णपदकाच्या जागी भारताला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं आहे. 




 


भारताच्या खात्यात 13 पदकं


भारताने बॅटमिंटनमध्ये जिंकलेल्या या रौप्य पदकामुळे भारताच्या खात्यात एकूण 13 पदकं झाली आहेत. यामध्ये सर्वाधिक पदकं ही वेटलिफ्टिंगमध्ये आहेत. वेटलिफ्टिंगमध्ये भारताने आठ पदकं जिंकली आहेत. यामध्ये मीराबाई चानू, अचिंता शेउली, जेरेमी लालरिनुंगा यांनी सुवर्णपदक जिंकलं असून संकेत सरगर, बिंद्याराणी देवी आणि विकास ठाकूर यांनी रौप्य पदक मिळवून दिलं आहे. तसंच गुरुराजा पुजारी आणि हरजिंदर कौर यांनी कांस्य पदकाला गवसणी घातली आहे. याशिवाय सुशीला देवीने ज्युदोमध्ये रौप्य मिळवलं असून विजयकुमारनेही कांस्य पदक मिळवलं आहे. तर लॉन बाऊल्समध्येही भारतीय महिलांच्या ग्रुपने फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला नमवत सुवर्णपदक जिंकलं आहे. तर टेबल टेनिसमध्ये पुरुष संघाने फायनलमध्ये सिंगापूरला मात देत सुवर्णपदकावर नाव कोरलं आहे.


हे देखील वाचा-