लंडन: कोणत्याही खेळात कर्णधाराची भूमिका महत्त्वाची असते. कर्णधारासाठी सर्व खेळाडू समान असतात. चांगला संघ बांधून विजय मिळवणं हे कर्णधाराचं ध्येय असतं. संघावर कोणतीही चांगली-वाईट वेळ आली तरी कर्णधाराने त्यासाठी पुढाकार घेणं आवश्यक असतं. कर्णधाराची नेमकी काय भूमिका असते, हे टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या नॉटिंगहॅम कसोटीत दाखवून दिलं.

नॉटिंगहॅमच्या ट्रेंट ब्रिज मैदानात खेळवण्यात आलेल्या तिसऱ्या कसोटीत विराट कोहलीने इंग्लंडच्या स्लेजिंगला जशास तसं उत्तर दिलं. इंग्लंडचा गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने भारताकडून कारकीर्दीतील पहिली कसोटी खेळणाऱ्या ऋषभ पंतवर शेरेबाजी केली. मात्र ते पाहून शांत राहील तो भारतीय कर्णधार कसला?

विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतचा हा पहिलाच कसोटी सामना होता. पंतने या कसोटीच्या पहिल्या डावात 24 धावा केल्या. ब्रॉडने त्याला 92 व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर त्रिफळाचीत केलं. पंत ज्यावेळी बाद होऊन पॅव्हेलियनकडे परतत होता, त्यावेळी ब्रॉडने त्याच्यासोबत स्लेजिंग केली.

ब्रॉडच्या या वर्तनाचा बदला कर्णधार विराट कोहलीने इंग्लंडच्या फलंदाजीवेळी घेतला.

स्टुअर्ट ब्रॉड फलंदाजीला आला त्यावेळी विराट कोहली क्षेत्ररक्षणासाठी स्लिपमध्ये उभा होता. भारतीय गोलंदाजांना चेंडू टाकताच, ब्रॉडने तो प्लेड केला. त्यावर कोहलीने ब्रॉडला ऋषभ पंतशी केलेल्या वर्तनाची आठवण करुन दिली. त्यावर ब्रॉड म्हणाला हे टेस्ट क्रिकेट आहे, इथे आक्रमक होणं आवश्यक आहे.

दरम्यान, ब्रॉडने पंतशी केलेल्या स्लेजिंगबद्दल आयसीसीने त्याला दंडही ठोठावला होता. ब्रॉडवर मॅच फीच्या 15 टक्के दंड ठोठावण्यात आला.


भारताचा विजय

टीम इंडियाने  इंग्लंडचा दुसरा डाव 317 धावांत गुंडाळून नॉटिंगहॅम कसोटीत 203 धावांनी दणदणीत विजय साजरा केला. या विजयासह भारताने पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पिछाडी 1-2 अशी भरुन काढली.

कोहली नंबर वन

इंग्लंडविरुद्धची नॉटिंगहॅम कसोटी खिशात घातल्यानंतर, टीम इंडियाचं रन मशीन अर्थात कर्णधार विराट कोहली पुन्हा एकदा अव्वलस्थानी विराजमान झाला आहे. पहिल्या डावात 97 आणि दुसऱ्या डावात 103 धावा ठोकणाऱ्या विराटने कसोटी रँकिंगमध्ये पहिल्या स्थानी झेप घेतली. ताज्या रँकिंगमध्ये विराटने ऑस्ट्रेलियाचा हकालपट्टी झालेला कर्णधार स्टीव्ह स्मिथला मागे टाकलं आहे. विराटच्या खात्यात 937 गुण जमा झाले आहेत.

संबंधित बातम्या

दहा मिनिटांत खेळ खल्लास, भारताचा इंग्लंडवर 203 धावांनी विजय 

रँकिंगमध्ये विराट कोहली पुन्हा नंबर वन!