IND vs ENG: भारत-इंग्लंडदरम्यान झालेल्या चौथ्या टी 20 सामन्यात 'सॉफ्ट सिग्नल'वरुन थर्ड अम्पायर वादात आहेत. त्यावरुन थर्ड अम्पायर असा ट्रेंड देखील सुरु आहे. चौथ्या टी -20 सामन्यात भारताने इंग्लंडचा आठ धावांनी पराभव केला आणि पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधली आहे. आता मालिका विजयासाठीचा अंतिम सामना उद्या, 20 मार्च रोजी खेळला जाणार आहे. चौथ्या सामन्यात सूर्यकुमार यादवला सॉफ्ट सिग्नल अंतर्गत आऊट देण्यात आलं. त्यानंतर हा वाद सुरु झाला. यावर दिग्गज खेळाडूंसह टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनं देखील प्रतिक्रिया दिली आहे.  


या सामन्यात सूर्यकुमार यादवला सॉफ्ट सिग्नल म्हणून आऊट देण्यात आलं. मात्र त्याच्या कॅचसंदर्भात बरंच द्विधावस्था होती. त्यात चेंडू जमिनीला लागल्याचं दिसत होतं. मैदानावरील अम्पायरनं त्याला आऊट दिलं. त्यामुळं सॉफ्ट सिग्नलमध्येही आऊट असंच सांगण्यात आलं. जर मैदानावरील अम्पायरनं नॉट आऊट दिलं असतं तो बाद झाला नसता. तसंच वॉशिग्टन सुंदर बाबतही झालं.  जोफ्रा आर्चरच्या चेंडूवर आदिल राशिदनं सीमारेषेजवळ त्याचा झेल घेतला. त्यावेळी त्याचा पाय सामारेषेला स्पर्श करत असल्याचं दिसत होतं. मात्र तिथंही सॉफ्ट सिग्नल म्हणून आऊट दिलं गेलं.  


काय आहे सॉफ्ट सिग्नल 
जर एखादा खेळाडू झेलबाद झाला आणि तो निर्णय स्पष्ट नसेल तर तो थर्ड अम्पायरकडे जातो.त्यावेळी मैदानावरील अम्पायरनं दिलेल्या निर्णयानुसार थर्ड अम्पायरला सॉफ्ट सिग्नल म्हणून आपला निर्णय द्यावा लागतो. जर कॅचसंदर्भात स्पष्ट निर्णय होऊ शकत नसेल अशा वेळी सॉफ्ट सिग्नल म्हणून थर्ड अम्पायर निर्णय देतो. अशा स्थितीत मैदानावरील अम्पायरनं दिलेला निर्णय थर्ड अम्पायर देखील कायम ठेवतात. नवीन तंत्रज्ञान आल्यानंतर असे बदल क्रिकेटमध्ये करण्यात आले आहेत. असाच निर्णय एलबीडब्ल्यू अर्थात पायचीत बाद झाल्यानंतरही घेतला जातो. पायचीत बाद असेल तरी अम्पायर कॉल म्हणून तो रद्द केला जातो. त्यावरुनही बऱ्याचदा टीका झाली आहे. 


काय म्हणाला विराट कोहली 
काल सामना संपल्यानंतर यावर बोलताना विराट म्हणाला की, आधी कसोटी मालिकेत असाच प्रकार झाला होता, तेव्हा अजिंक्य रहाणेने कॅच पकडला होता, पण त्याला पूर्ण खात्री नव्हती. जेव्हा क्लोज कॉल असतात तेव्हा सॉफ्ट सिग्नल खूप मह्त्त्वाचे ठरतात. मला कळत नाही की मैदानावरील पंच सॉफ्ट सिग्नल देताना मला माहित नाही (I Don’t Know) असं का नाही सांगू शकत. सॉफ्ट सिग्नल निर्णायकच का हवा. मत्याचा सगळ्या निर्णयावर परिणाम होत असतो. मैदानावरच सर्व स्पष्ट असणं महत्त्वाचं आहे, अशा शब्दात विराटने सॉफ्ट सिग्नलविरोधात नाराजी व्यक्त केली.