मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कार्पिओ आढळल्यानंतर या प्रकरणाचा समांतर तपास NIA आणि ATS करत होती. त्यावेळी सचिन वाझे हे मृत मनसुख हिरणच्या सातत्याने संपर्कात असल्याची माहिती त्यांच्या सीडीआरमधून उघडकीस आली आहे.
हा तपास सीआययूकडे असताना या प्रकरणाचा तपास नेमका कोणत्या दिशेने चालला आहे तसेच यामध्ये नेमकी काय चौकशी केली जात आहे याची सारी डिटेल्स सचिन वाझे घेत असल्याचं त्यांच्या सीडीआरमधून स्पष्ट झालं आहे.
सचिन वाझे यांच्या सीडीआरमधून हेही समोर आलंय की 3 आणि 4 मार्च म्हणजे मनसुख हिरण यांच्या गायब होण्याच्या दिवसापर्यंत ते सातत्याने हिरण यांच्या संपर्कात होते. त्याच वेळी क्राईम ब्रॅन्चचे नितिन अलक्नुरे या प्रकरणाचा तपास करत असल्याने वाझे यांच्या हातातून हा तपास काढून घेण्यात आला. त्याचवेळी NIA आणि ATS सातत्याने मनसुख हिरण यांची चौकशी करत होती.
आता सचिन वाझेंच्या हातून हा तपास काढून घेण्यात आल्यानंतर सचिन वाझे आणि मनसुख हिरण यांच्यामध्ये त्या दोन दिवसांमध्ये नेमकी काय चर्चा झाली हे ATS ला जाणून घ्यायचं आहे. ATS ने याबाबत सचिन वाझे यांची या आधी चौकशी केली आहे पण वाझे यांनी दिलेल्या उत्तरावर ATS समाधानी नसल्याचं समजतंय.
'वकिलांशी भेटीच्यावेळी एनआयए अधिकाऱ्यांची उपस्थिती नको' सचिन वाझे यांची कोर्टात नवी याचिका
वाझे यांनी मनसुख हिरण यांच्याकडून 2 मार्चला पत्र का लिहून घेतलं आणि त्या पत्रानंतर मनसुख हिरण यांचा मृत्यू झाला. ते पत्र लिहून घेणं म्हणजे मनसुख याच्या मृत्यूचे नियोजन करण्यात आलं होतं का असा प्रश्नही ATS ला पडला आहे. आता या प्रश्नांची उत्तरं ATS शोधण्याचा प्रयत्न करत आहे.
एनआयएच्या कोठडीत असलेल्या सचिन वाझे यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. सचिन वाझे यांनी तपासाच्या नावाखाली ठाण्यातील दुकानदाराची डायरी, रेकॉर्ड्स, सीसीटीव्हा फुटेज जप्त केले होते. मात्र या वस्तू कायद्यानुसार त्यांनी रेकॉर्डवर घेतली नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे तपासाच्या नावाखाली वाझे यांनी पुरावे नष्ट केले का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मनसुख हिरण प्रकरणात अनेक धागेदोरे समोर येत असताना, गाडीत सापडलेल्या बनावट नंबर प्लेट मिळाल्या त्या ठाण्यातील नौपाडा भागातील सदगुरु कार डेकोरेटरच्या दुकानातून बनवल्या गेले असल्याची धक्कादायक माहिती सूत्रांनी दिली आहे. पण या दुकानातून जप्त करण्यात आलेल्या वस्तूंचा कोणताही रेकॉर्ड ठेवण्यात आला नसल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. दुकानदाराने वाझे आणि त्याच्या पथकाने दुकानातील CCTV, डीव्हीआर मशीन, रेकॉर्ड नेल्याचे कबूल केलं आहे. या संपूर्ण घटनेची आता गंभीर दखल ही घेण्यात आली असून या प्रकरणी CIU च्या अधिकाऱ्यांची सध्या चौकशी सुरू आहे.
मुंबई पोलीस आयुक्तांची बदली रुटीन नव्हती, काही चुका अक्षम्य होत्या म्हणून बदली : अनिल देशमुख