Virat Kohli : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनं काल इंग्लंडविरोधात आपलं अनोखं द्विशतक केलं आहे. भारतीय संघासाठी 200 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये कर्णधार म्हणून नेतृत्व करण्याचा मान त्यानं मिळवला आहे. अशी कामगिरी करणारा तो तिसरा कर्णधार ठरला आहे. धोनीने जानेवारी 2017मध्ये कर्णधार पद सोडल्यानंतर टीम इंडियाच्या कर्णधारपदाची धुरा विराटनं स्विकारली होती.  


विराट कोहली आता माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि मोहम्मद अझरुद्दीन यांच्या यादीत सामील झाला आहे. विराटच्या आधी धोनीनं 332 तर अझरुद्दीननं 221 सामन्यांत भारतीय संघाचं कर्णधारपद सांभाळले आहे. आता कोहलीकडे वनडे, कसोटी आणि टी 20 या तीनही स्वरूपात टीम इंडियाची जबाबदारी आहे.  


सामना संपल्यानंतर भुवनेश्वर-शार्दुलवरुन विराट कोहली संतापला


पुण्यात खेळल्या गेलेल्या तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात भारताने इंग्लंडला 7 धावांनी पराभूत केले. यासह टीम इंडियाने एकदिवसीय मालिका 2-1 ने  खिशात घातली. सामना संपल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली मात्र संतापलेला दिसला. भुवनेश्वर कुमारला मॅन ऑफ द सीरिज आणि शार्दुल ठाकूरला मॅन ऑफ द मॅच पुरस्कार न मिळाल्याबद्दल विराट कोहलीने नाराजी व्यक्त केली.


कालच्या अंतिम सामन्यात सॅम करनला मॅन ऑफ द मॅच म्हणून गौरवण्यात आलं. त्याने इंग्लंडला 95 धावांची खेळी करून विजयाच्या जवळ नेले. याशिवाय मालिकेच्या पहिल्या सामन्यात 94 धावा आणि दुसऱ्या सामन्यात 124 धावा करणारा इंग्लंडचा सलामीवीर जॉनी बेअरस्टोने मॅन ऑफ द सीरिज ठरला.मात्र हा निर्णय विराट कोहलीला पटला नाही.  याबद्दल विराटने नाराजी व्यक्त केली. विराट म्हणाला, "भुवीला मॅन ऑफ द सीरिजचा पुरस्कार का मिळाला नाही हे मला समजत नाही. अशा खेळपट्ट्यांवर फारच कमी धावा देत सहा विकेट घेणे मॅन ऑफ द सीरिज प्रमाणेच आहे. तर शार्दुलने 30 धावा केल्या आणि चार विकेट्स घेतल्या परंतु तरीही तो मॅन ऑफ द मॅच ठरला नाही. हे पूर्णपणे समजण्यापलीकडे आहे.''


Ind vs Eng 2021 | सॅम करनची झुंज अपयशी; 7 धावांनी सामना जिंकत मालिका भारताच्या खिशात


मालिकेच्या शेवटच्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडसमोर विजयासाठी 330 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. परंतु इंग्लंडचा संघ 50 षटकांत 9 विकेट गमावून केवळ 322 धावा करू शकला. कसोटी आणि टी -20 मालिकेनंतर इंग्लंडने भारताविरोधात एकदिवसीय मालिका देखील गमावली.