बर्मिंगहॅम/मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने इंग्लंडच्या भूमीवर पहिलं कसोटी शतक झळकावून, एजबॅस्टनवर भारताच्या आव्हानात नवी जान भरली. विराटने एकहाती किल्ला लढवून झळकावलेल्या या शतकामुळेच इंग्लंडला पहिल्या डावात अवघी 13 धावांची आघाडी मिळाली. आता दुसऱ्या डावातही विराट कोहली अजूनही मैदानात उभा आहे. त्यामुळे भारताच्या आव्हानात धुगधुगी कायम आहेत.
अखेर विराट कोहलीने एजबॅस्टन कसोटीत शतक ठोकून इंग्लिश भूमीवरची अपयशाची मालिका खंडित केली. टीम इंडियाच्या कर्णधाराचं इंग्लंड दौऱ्यातलं हे पहिलं शतक इतकं मोठं होतं की, त्याने इंग्लंडमधल्या पाच कसोटी सामन्यांमधला धावांचा बॅलन्सही खुजा ठरला.
विराट कोहलीला 2014 सालच्या इंग्लंड दौऱ्यात पाच कसोटी सामन्यांमध्ये मिळून केवळ 134 धावाच जमवता आल्या होत्या. उजव्या यष्टीबाहेरच्या चेंडूंना छेडण्याचा विराटचा कच्चा दुवा इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांनी नेमका हेरला होता. त्यामुळे दहापैकी चार डावांत त्याला जेम्स अँडरसनने माघारी धाडलं. स्टुअर्ट ब्रॉड आणि ख्रिस जॉर्डनने विराटचा प्रत्येकी दोनवेळा काटा काढला. आणि एकदा लियाम प्लन्केटने त्याची विकेट काढली होती.
टीम इंडियाच्या कर्णधाराने एजबॅस्टन कसोटीच्या पहिल्याच डावात 149 धावांची खेळी उभारून इंग्लिश गोलंदाजांना सलामीलाच इशारा दिला. विराटने 225 चेंडूंमधल्या या खेळीला 22 चौकार आणि एका षटकाराचा साज चढवला.
विराटच्या या खेळीचं वैशिष्ट्य म्हणजे त्याने वारंवार गार्ड बदलून इंग्लिश गोलंदाजांना पेचात पकडलं. त्याने शतकाआधी मोठा फटका खेळण्यासाठी खराब चेंडूची प्रतीक्षा केली. त्यामुळे विराटचं शतक साजरं झालं त्या वेळी तब्बल 40 चेंडूंवर त्याच्या नावावर एकही धाव नव्हती. त्यापैकी 26 चेंडू हे विराटचा कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या जेम्स अँडरसनचे होते. जगातला एक सर्वोत्तम स्ट्रोकप्लेयर असा विराटचा लौकिक आहे. आपल्या त्याच वैशिष्ट्याला मुरड घालून खेळण्याची चिकाटी भारतीय कर्णधाराने एजबॅस्टनवर दाखवली. त्यामुळेच समोरच्या एंडने खंबीर साथ न लाभूनही एकट्या विराट कोहलीने टीम इंडियाला इंग्लंडच्या धावसंख्येच्या वेशीवर नेऊन ठेवलं.
विराट कोहलीने एजबॅस्टन कसोटीत उभारलेली खेळी टीम इंडियाच्या इंग्लंड दौऱ्याला कलाटणी देणारी ठरू शकते. भारतीय कर्णधाराने 2014 सालच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातल्या अॅडलेड कसोटीत झळकावलेलं शतक ही त्याची आजवरची सर्वोत्तम खेळी मानली जाते. त्या कसोटीत 364 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना विराटने पाचव्या दिवशी शतक साजरं केलं होतं. पण भारताला चुटपूट लावणारा पराभव स्वीकारावा लागला होता.
विराटच्या मते, एजबॅस्टनवरचं शतक ही त्याची दुसरी सर्वोत्तम खेळी ठरावी. पण या शतकाने एजबॅस्टन कसोटी टीम इंडियाच्या बाजूने झुकवली, तर विराट कोहलीलाही आपलं मत बदलावं लागेल.
दुसऱ्या डावातही भारताची मदार विराट कोहलीवरच!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
04 Aug 2018 08:04 AM (IST)
विराटने एकहाती किल्ला लढवून झळकावलेल्या शतकामुळेच इंग्लंडला पहिल्या डावात अवघी 13 धावांची आघाडी मिळाली. आता दुसऱ्या डावातही विराट कोहली अजूनही मैदानात उभा आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -