अहमदनगर/औरंगाबाद : अहमदनगरमधील नेवासा शहरात मराठा, मुस्लिम आणि धनगर समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आज तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. मराठा, मुस्लिम आणि धनगर समाजाने प्रथमच आरक्षणच्या मागणीसाठी एकत्रित मोर्चा काढला. हजारो महिला, पुरूष, विद्यार्थी, वकील, डॉक्टर यांच्यासह मोठ्या संख्येने लोक या मोर्चात सहभागी झाले होते.
अहमदनगरच्या इदगाह मैदानावरून या मोर्चाला सुरुवात झाली. माजी आमदार शंकरराव गडाखही या मोर्चात सहभागी सहभागी झाले होते. आमच्या हक्काचं आरक्षण आम्हाला मिळायलाच हवे ही मागणी करत हजारोंचा मोर्चा नेवासा तहसीलदार कार्यालयावर धडकला. मोर्चादरम्यान आंदोलकांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आरक्षणाची मागणी केली.
"गेल्या चार वर्षापासून सरकारने जनतेची केवळ दिशाभूल केल्यानं आज राज्यभर आक्रोश सुरू झाला आहे. आता मराठा समाजासोबत मुस्लिम व धनगर समाजही एकत्रित आंदोलनात सहभागी झाला आहे. विविध समाजामध्ये भांडण लावण्याचं षडयंत्र आम्ही उधळून लावणार आहोत", अस गडाख यांनी आपल्या भाषणात म्हटलं.
आंदोलनात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तब्बल दोन तास तहसील कार्यालयावर ठिय्या दिल्यानंतर तहसीलदारांना निवेदन देऊन आंदोलन संपवण्यात आलं.
औरंगाबादेतही आरक्षणाच्या मागणीसाठी मुस्लिम समाज रस्त्यावर
औरंगाबादमध्ये मुस्लीम समाजाला पाच टक्के आरक्षण मिळावे या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं. यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. तसेच न्यायालयाने दिलेले पाच टक्के आरक्षण राज्य सरकारने त्वरित द्यावे अशी मागणी देखील करण्यात आली. महाराष्ट्र मुस्लिम अवाम कमिटी संघटनेने हे आंदोलन उभारलं होतं.