Indea Beat England : रोहित शर्माच्या टीम इंडियाने रांची कसोटीतही (Ranchi Test) तिरंगा फडकावून, इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका खिशात टाकली. सलामीवीर शुभमन गिलचं (Shubman Gill) संयमी अर्धशतक आणि ध्रुव जुरेलची (Dhurv Jurel) पुन्हा चमकदार खेळीमुळे भारताने चौथ्या कसोटीत (India vs England 4th Test) इंग्लंडवर 5 विकेट्स राखून विजय मिळवला. चौथ्या कसोटीत ब्रिटिशांनी भारतीय क्रिकेट संघासमोर 192 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. साहेबांचं लक्ष्य स्वीकारून मैदानात उतरलेल्या टीम इंडियानं तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत एकही विकेट न गमावता 40 धावा केल्या होत्या. मात्र आज आघाडीची पडझड झाल्यानंतर टीम इंडिया संकटात आली होती, पण शुभमन गिल आणि ध्रुव जुरेल यांनी जबरदस्त खेळी करत, टीम इंडियाला विजय मिळवून दिला.


गिल आणि ध्रुव जुरेलने संयमी खेळी करत विजय साकारला


टीम इंडियाने तिसऱ्या दिवशी इंग्लंडला दुसऱ्या डावात लवकर गुंडाळत कसोटीत वापसी केली होती. विजयासाठी 192 धावांचे आव्हान घेऊन उतरल्यानंतर यशस्वी आणि रोहितने 84 धावांची सलामी दिली होती. मात्र, त्यानंतर 36 धावांत पाच विकेट गमावल्याने टीम इंडिया बॅकफूटवर गेली होती. त्यानंतर गिल आणि ध्रुव जुरेलने संयमी खेळी करत विजय साकार केला. 


तत्पूर्वी, यशस्वी जैस्वाल 37 धावांवर बाद झाला. यानंतर कॅप्टन रोहित शर्माही 55 धावा करून बाद झाला. यानंतर रजत पाटीदार पुन्हा अपयशी ठरल्याने टीम इंडियाची अवस्था 3 बाद 100 अशी झाली. उपहारापूर्वी टीम इंडियाने 3 बाद 118 अशी मजल मारली होती. उपहारानंतर टीम इंडियाच्या डावाला सुरुवात झाल्यानंतर जडेजा आणि सरफराज लागोपाठ बाद झाल्याने टीम इंडियाची अवस्था 5 बाद 120 झाली होती. मात्र, त्यानंतर आणखी पडझड होऊ न देता गिल आणि जुरेलने विजय साकारला. 


अश्विन आणि कुलदीप यादवच्या फिरकीच्या जोरावर बाजी पलटली 


दुसरीकडे, दुसऱ्या दिवशी बॅकफूटवर गेलेल्या टीम इंडियाने तिसऱ्या दिवशी अश्विन आणि कुलदीप यादवच्या फिरकीच्या जोरावर बाजी पलटली. इंग्लंडचा दुसरा डाव दोघांनी अवघ्या 145 धावांमध्ये गुंडाळला. तत्पूर्वी, ध्रुव जुरेलने केलेल्या 90 धावांच्या खेळीमुळे पहिल्या डावात टीम इंडियाला त्रिशतकी मजल मारता आली. त्याला कुलदीप यादवने संयमी साथ दिली.  तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने एकही विकेट न गमावता 40 धावा केल्या होत्या. 


इतर महत्वाच्या बातम्या