IND vs ENG 3rd Test : भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान हेडिंग्ले येथील लीड्स येथे खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय फलंदाजांनी इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांसमोर अक्षरशा नांग्या टाकल्या. तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात टीम इंडिया अवघ्या 78 धावांवर ऑल आऊट झाली. इंग्लंडच्या घातक गोलंदाजीसमोर भारताचे 9 खेळाडू दुहेरी आकडाही गाठू शकले नाहीत. भारतीय संघाने आपले शेवटचे 5 फलंदाज फक्त 11 धावांवर गमावले.
रोहित शर्मा (19) आणि अजिंक्य रहाणे (18) सोडले, तर एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. भारताच्या डावात केएल राहुल 00, चेतेश्वर पुजारा 01, विराट कोहली 07, ऋषभ पंत 02, रवींद्र जडेजा 04, मोहम्मद शमी 00, जसप्रीत बुमराह 00 आणि मोहम्मद सिराज यांनी 03 धावा केल्या, तर इशांत शर्मा 08 धावांवर नाबाद राहिला. इंग्लंडने अतिरिक्त 16 धावा दिल्या अन्यथा भारतीय संघ 62 धावांवर सर्वबाद झाला असता. इंग्लंडविरुद्ध भारताची ही तिसरी सर्वात नीचांकी धावसंख्या आहे. याआधी 1974 मध्ये लॉर्ड्स कसोटीत भारत 42 आणि 1952 मध्ये मँचेस्टरमध्ये 58 धावांवर ऑलआऊट झाला होता. कसोटी क्रिकेटमधील भारताची ही नववी सर्वात निचांकी धावसंख्या आहे. गेल्या वर्षी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर अॅडलेडमध्ये टीम इंडिया फक्त 36 धावांवर ऑलआऊट झाली होती.
दरम्यान भारताच्या पहिल्या डावाच्या प्रत्युत्तरात इंग्लंडचे सलामीवीर फलंदाज हसीब हमीद आणि रोरी बर्न्स यांनी शतकी भागीदारी रचली आहे. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा इंग्लंडने एकही विकेट न गमावता 120 धावा केल्या असून त्यांच्याकडे आता 42 धावांची आघाडी आहे. बर्न्स 5 चौकार आणि एका षटकारासह नाबाद 52 आणि हमीद 11 चौकारांसह नाबाद 60 धावांवर नाबाद आहे. आज दुसऱ्या दिवशी इंग्लंड भक्कम आघाडी घेण्याची शक्यता आहे.