IND vs Eng 2nd Test : भारताने विशाखापटनम कसोटीमध्ये इंग्लंडचा (IND vs Eng) 106 धावांनी धुव्वा उडवला. इंग्लंडविरुद्धच्या (IND vs Eng) या विजयामुळे भारतीय संघाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (ICC World Test Championship) पॉईंट्स टेबलमध्ये मोठी झेप घेतली आहे. विशाखापटन कसोटीपूर्वी टीम इंडिया पॉईंट्स टेबलमध्ये पाचव्या नंबरवर होती. मात्र, आजच्या विजयामुळे रोहित ब्रिगेडने गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. त्यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत भारतीय संघाने तीन पाऊले पुढे टाकली आहेत. 


ऑस्ट्रेलियन संघ पहिल्या क्रमांकावर 


इंग्लंडला पराभूत केल्यानंतर भारताच्या विजयाची टक्केवारी 52.77 इतकी झाली आहे. टीम इंडियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 च्या वर्तुळात आत्तापर्यंत  6 कसोटी सामने खेळले आहेत. त्यातील 3 सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवलाय. 2 सामन्यात भारताचा पराभव झालाय. तर 1 सामना अनिर्णयीत राहिलाय. सध्या गुणतालिकेत कांगारु पहिल्या क्रमांकावर आहेत. ऑस्ट्रेलियाने 10 कसोटी सामने खेळले आहेत, त्यातील 6 सामन्यात विजय मिळवलाय. 3 सामन्यात कांगारुंना पराभवाचा सामना करावा लागलाय. तर ऑस्ट्रेलियाची विजयाची टक्केवारी 55.00 एवढी आहे. त्यामुळे कांगारु या गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहेत. 


गुणतालिकेतील टॉप -5 संघ कोणते?


वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंट्स टेबलमध्ये (ICC World Test Championship) ऑस्ट्रेलियन संघ पहिल्या क्रमांकावर आहे. भारताने आज इंग्लंडचा पराभव करत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. याशिवाय दक्षिण आफ्रिका तिसऱ्या क्रमांकावर आहे. आफ्रिकेने 2 सामन्यांतील 1 सामना जिंकला आहे. पुढे न्यूझीलंडचा संघ चौथ्या तर बांगलादेश पाचव्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंड आणि बांगलादेशने प्रत्येकी 2 सामने खेळले असून दोघांनीही एकाच सामन्यात विजय मिळवलाय. 


भारताने मालिकेत बरोबरी केली


भारताने दुसऱ्या कसोटीत इंग्लंडला 106 धावांनी पराभूत करत 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली आहे. भारताकडून दुसऱ्या डावातही जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि आर अश्विनने (R Ashwin) आक्रमक मारा केला. दोघांनी इंग्लंडच्या फलंदाजाना गुंडाळण्यात महत्त्वाची कामगिरी बजावली. दुसऱ्या डावात बुमराह आणि अश्विनने प्रत्येकी 3-3 विकेट्स पटकावल्या. त्यामुळे भारताच्या 399 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या इंग्लंडचा दुसरा डाव  292 धावांवर आटोपला. 






इतर महत्वाच्या बातम्या 


IND Vs ENG, Match Highlights : इंग्लंडची धूळदाण, टीम इंडियाचा 106 धावांनी विजय; बुमराह-अश्विनचा प्रभावी मारा