IND vs ENG 1st Test Day 3 highlights चेन्नईमध्ये सुरु असणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यावर पहिल्याच दिवसापासून इंग्लंडचं वर्चस्व पाहायला मिळालं. तिसऱ्या दिवशीही भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंना हे चित्र बदलता आलं नाही. इंग्लंडनं पहिल्या डावात उभ्या केलेल्या डोंगराएवढ्या मोठ्या धावसंख्येनंतर मैदानात आलेल्या भारतीय संघाची खेळी काहीशी अडखळताना दिसली. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारतीय संघाचे 6 खेळाडू तंबूत परतले होते.


आतापर्यंत भारतीय संघानं 257 धावा केल्या असून, इंग्लंडच्या धावांपासून संघ तब्बल 321 धावा मागे आहे. चौथ्या दिवशी फॉलोऑन टाळणं हेच भारतीय संघापुढचं मोठं आव्हान असणार आहे. दरम्यान, तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी वॉशिंग्टन सुंदर 33 आणि अश्विन 8 धावा करुन खेळपट्टीवर टीकून होते.


... असा होता पहिल्या कसोटीचा तिसरा दिवस


इंग्लंडच्या संघाने सर्वबाद 578 धावा केल्या. ज्यानंतर फलंदाजीसाठी मैदानात आलेल्या भारतीय संघाची सुरुवात अतिशय वाईट ठरली. सलामीवीर रोहित शर्मा जोफ्रा आर्चरच्या चेंडूवर अवघ्या 6 धावा करुन बाद झाला. ज्यानंतर चांगली कामगिरी करणाऱ्या शुभमन गिल यानं 28 चेंडूंमध्ये 29 धावा केल्या आणि तोसुद्धा तंबूत परतला. आर्चरनंच त्याचाही विकेट घेतला. त्याच्यामागोमाग विराट कोहली अवघ्या 11 धावांवर झेलबाद झाला.


पुजारानं संयमी खेळी करत 143 चेंडूंमध्ये 73 धावा केल्या. या खेळीमध्ये त्यानं 11 चौकार लगावले. कसोटी क्रिकेट कारकिर्दीतील हे त्याचं 29वं अर्धशतक ठरलं. पुजारा बाद झाल्यानंतर ऋषभ पंतनं संघाच्या धावसंख्येत 91 धावांचं योगदान देत परतीची वाट धरली. या खेळीत पंतनं 9 चौकार आणि 5 षटकार लगावले. कसोटी क्रिकेटमधील हे त्याचं पाचवं अर्धशतक ठरलं.


शिवसेना म्हणजे आयत्या बिळावर नागोबा; नारायण राणेंची टीका


खेळपट्टीवर स्थिरावलेले हे दोन्ही खेळाडू बाद झाल्यानंतर वॉशिंग्टन सुंदर आणि आर. अश्विननं संघाची धुरा सांभाळली. सुंदरनं 68 चेंडूंवर 33 धावा केल्या तर, 54 चेंडूंचा सामना करणाऱ्या अश्विननं 8 धावा केल्या. ज्यानंतर तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबवण्यात आला. त्यामुळं चौथ्या दिवशी भारतीय संघाच्या फलंदाजीचा डाव सावरतो का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.