मुझ्झफ्फरनगर (उत्तर प्रदेश): मुझ्झफ्फरनगर पोलिसांचा एक अविभाज्य घटक असलेल्या टिंकी या आठ वर्षाच्या श्वानाचा गेल्या वर्षी मृत्यू झाला होता. आता मुझ्झफ्फरनगर पोलीसांनी टिंकीला अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली वाहिली असून तिची प्रतिमा स्थापन करण्यात आली आहे.


गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये टिंकी या पोलीस श्वानाचा मृत्यू झाला होता. काही दिवस आजारी असलेल्या टिंकीच्या पोटाच्या विकाराने उग्र रुप धारण केले आणि त्यातच तिचा मृत्यू झाला होता. टिंकीने अशक्यप्राय असलेल्या अशा 49 प्रकरणांचा तपास लावला होता. टिंकीच्या मृत्यूनंतर सन्मानासह तिचे अंतिम संस्कार करण्यात आले होते.





टिंकीने 2014 मध्ये कॉन्स्टेबल म्हणून पोलीस दलात काम सुरु केल्यानंतर आपल्या कामाने अनेकांची मने जिंकली. आपल्या कामाबाबत सजग असलेल्या टिंकीने तब्बल 49 अशा गुन्ह्यांचा छडा लावला ज्यांचा शोध लावणे पोलिसांसाठी जवळपास अशक्यप्राय झालं होतं. कसलाही सुगावा मिळत नसलेल्या अशा गुन्ह्यांना ब्लाईंड क्राईम म्हणतात. अशा ब्लाईंड क्राईमची उकल करण्यात तिचा हातखंडा होता. अशा प्रकारच्या अप्रतिम कामगिरीमुळे टिंकीला केवळ 6 वर्षातच 6 प्रमोशन मिळाली होती आणि या जोरावर तिने अतिरिक्त एसपी अर्थात अतिरिक्त पोलिस अधिक्षकपदापर्यंत मजल मारली होती


ग्वाल्हेर येथील बीएसएफच्या नॅशनल डॉग ट्रेनिंग सेंटरमध्ये प्रशिक्षण घेत असलेली टिंकी ही जर्मन शेफर्ड श्वान मुझ्झफ्फरनगर पोलीस व्यवस्थेचा एक भाग बनली. स्निफर डॉग म्हणून तिला पहिली पोस्टिंग मिळाली. मुझ्झफ्फरनगरचे एसएसपी अभिषेक यादव तिच्याबाबत बोलताना म्हणाले की होते की, "टिंकी ही अत्यंत हुशार, धाडसी आणि चाणाक्ष होती. तिने आतापर्यंत अशक्यप्राय अशा 49 प्रकरणांचा छडा लावला आहे. मुझ्झफ्फरनगर पोलिसांनी टिंकीच्या स्मरणार्थ आयोजित केलेल्या श्रध्दांजली कार्यक्रमात आपल्या आवडत्या सदस्याला शेवटचा निरोप दिला होता. त्यावेळी अनेकांच्या डोळ्यात अश्रू आले होते.


अनेक गुन्ह्यांचा छडा लावणाऱ्या सुपर K9 अतिरिक्त एसपी टिंकीने घेतला अंतिम श्वास, पोलीसांकडून मानवंदना