कोलकाता : जलदगती गोलंदाज ईशांत शर्मा, उमेश यादव आणि मोहम्मद शमी यांच्या भेदक आक्रमणासमोर कोलकात्याच्या ऐतिहासिक डे-नाईट कसोटीत (पिंक बॉल कसोटीत) बांगलादेशचा पहिला डाव अवघ्या 106 धावांत आटोपला. गुलाबी चेंडूवर पहिल्यांदाच खेळणाऱ्या बांगलादेशी फलंदाजांचा भारतीय वेगवान माऱ्यासमोर अजिबात टिकाव लागू शकला नाही. त्यामुळे केवळ 30.3 षटकांत बांगलादेशचा डाव संपुष्टात आला. भारताकडून ईशांत शर्माने 22 धावांत सर्वाधिक पाच फलंदाजांना माघारी धाडले. तर उमेश यादवने 29 धावांत 3 आणि मोहम्मद शमीनं 36 धावांत बळी घेतले.
ईशांत शर्मानं वैयक्तिक चौथ्याच षटकात बांगलादेशला पहिला धक्का दिला. त्यानंतर उमेश यादव आणि मोहम्मद शमीनं कर्णधार मोमिनुल हक, मोहम्मद मिथुन आणि मुशफिकुर रहीम या तिघांनाही शून्यावर बाद करत बांगलादेशच्या डावाला सुरुंग लावला. उपाहारापर्यंत बांगलादेशची सहा बाद 73 अशी अवस्था झाली होती. उपाहारानंतर अवघ्या नऊ षटकांत भारताच्या वेगवान त्रिकुटानं बांगलादेशी तळाच्या फलंदाजांना गुंडाळलं.
बांगलादेशच्या केवळ तीन फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली. सलामीवीर शदमन ईस्लामने सर्वाधिक 29 धावांचे योगदान दिलं. लिटन दासने 24 तर नईम हसनने 19 धावा केल्या.
शेख हसीना, ममता बॅनर्जींच्या हस्ते उद्घाटन
ईडन गार्डन्सवरच्या ऐतिहासिक कसोटी सामन्याच्या उद्घाटन सोहळ्याला बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी खास हजेरी लावली होती. शेख हसीना आणि ममता बॅनर्जी यांच्या हस्ते बेल वाजवून या कसोटीला प्रारंभ झाला. त्याआधी शेख हसीना आणि ममता यांनी दोन्ही संघातील खेळाडूंची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली हे दोघेही उपस्थित होते.
IND vs BAN 2nd Test : भारतीय गोलंदाजांची 'गुलाबी जादू', बांगलादेशचा 106 धावांत खुर्दा, ईशांतच्या पाच विकेट्स
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
22 Nov 2019 05:33 PM (IST)
भारत आणि बांगलादेश संघांमध्ये खेळवण्यात आलेल्या ऐतिहासिक डे-नाईट कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात भारतीय गोलंदाजांनी बांगलादेशचा पहिला डाव अवघ्या 106 धावांत संपवला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -