रांची : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सुरु असलेल्या सामन्यातील आजचा चौथ दिवस चेतेश्वर पुजारा आणि रिद्धिमान साहा यांनी चांगलाच गाजवला. दोघांनी जवळपास 150 धावांची भागिदारी करुन भारतीय संघाला मजबूत स्थिती मिळवून दिली. पण चौथ्या दिवसाचा खेळ सुरु असताना एक अशी घटना होता होता टळली, ज्यामध्ये अम्पायरच्या चुकीच्या निर्णयाचा फटका चेतेश्वर पुजाराच्या खेळीला झाला असता.


वास्तविक, आजचा खेळ सुरु झाल्यानंतर भारतीय संघाच्या आपल्या पहिल्या डावातील 140 वी ओव्हर सुरु होती. यावेळी हेजलवुडनं आपल्या 33 व्या ओव्हरमधील तिसरा चेंडू चेतेश्वर पुजाराला बाऊंसर टाकला. मात्र हा चेंडू चेतेश्वरच्या बॅटला स्पर्श न करता, सुरक्षित यष्टिरक्षकाच्या हातात गेला.

यावेळी यष्टिरक्षक आणि गोलंदाज हेजलवुड यापैकी कुणीही अपील केलेली नव्हती. पण तरीही फील्ड अम्पायर गूफी गॅफनी यांनी पुजाराला बाद घोषित करण्यासाठी बोट वर केलं. मात्र, जेव्हा क्षेत्ररक्षण करणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाकडून कोणतीही अपील न झाल्याचे पाहून गॅफनी यांनी वर केलेला हात सरळ आपल्या टोपीकडे नेला.

ऑस्ट्रेलियन संघाला जाणिव होण्याआधी खूप वेळ झाला होता. पण यामुळे पुजारा अम्पायरच्या चुकीच्या निर्णयाचा फटका बसण्यापासून थोडक्यात बचावला. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा टीम इंडियानं आपला पहिला डाव नऊ बाद 603 या धावसंख्येवर घोषित करून, 152 धावांची आघाडी घेतली होती. तर फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाने आपल्या दुसऱ्या डावाची सुरुवात करताना दोन गडी बाद 23 धावा ठोकल्या होत्या.

व्हिडिओ पाहा