सिडनी : विराट कोहलीच्या टीम इंडियासमोर ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील तिसरा ट्वेन्टी ट्वेन्टी सामना जिंकण्यासाठी 165 धावांचं आव्हान आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियानं 20 षटकांत सहा बाद 164 धावांची मजल मारली. कर्णधार अॅरॉन फिन्च आणि डी' आर्सी शॉर्टनं 63 धावांची सलामी देऊन या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या डावाचा भक्कम पाया रचला होता.
मात्र डावखुरा स्पिनर कृणाल पंड्यानं 36 धावांत चार फलंदाजांना माघारी धाडून ऑस्ट्रेलियाच्या डावाला ब्रेक्स लावले. त्यानंतर मार्कस स्टॉयनिस आणि नॅथन कूल्टर नाईलनं सातव्या विकेटसाठी रचलेल्या 33 धावांच्या अभेद्य भागिदारीनं ऑस्ट्रेलियाला सहा बाद 164 धावांची मजल मारून दिली.
तीन सामन्यांच्या या मालिकेत ऑस्ट्रेलियानं पहिला सामना जिंकून 1-0 अशी आघाडी घेतली आहे. मेलबर्नचा दुसरा ट्वेन्टी ट्वेन्टी पावसामुळं रद्द करावा लागला होता. त्यामुळे मालिकेत बरोबरी साधण्यासाठी भारताला सिडनीचा टी-20 सामना जिंकावाच लागेल.
गेल्या वर्षीच्या जुलैपासून भारतीय संघ ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांमध्ये अपराजित आहे. भारतानं 27 पैकी 20 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तसेच श्रीलंकेतील तिरंगी मालिकेपासून भारतानं ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांच्या सलग 7 मालिका जिंकल्या आहेत.