सिडनी : टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातला तिसरा आणि अखेरचा ट्वेन्टी ट्वेन्टी सामना आज सिडनीत खेळवण्यात येईल. भारतीय वेळेनुसार हा सामना दुपारी दीड वाजता सुरु होईल. ऑस्ट्रेलियानं ब्रिस्बेनचा पहिला सामना जिंकून, तीन ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.


मेलबर्नचा दुसरा जिंकून मालिकेत बरोबरी करण्याची मोठी संधी भारतीय संघाला होती. मात्र पावसामुळे सामना रद्द करावा लागला होता. त्यामुळे आता अखेरचा सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न आहे.


गेल्या वर्षीच्या जुलैपासून भारतीय संघ ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांमध्ये अपराजित आहे. भारतानं 27 पैकी 20 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तसेच श्रीलंकेतील तिरंगी मालिकेपासून भारतानं ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांच्या सलग सात मालिका जिंकल्या आहेत.


भारतीय संघाचा मालिका बरोबरीत सोडण्याचा प्रयत्न असणार आहे. मेलबर्न येथील सामन्यात भारतीय गोलंदाजांनी चांगलं प्रदर्शन केलं होतं.