बंगळुरु : ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांच्या हत्येचा कट पाच वर्षांपासून रचला जात होता, अशी माहिती विशेष तपास पथकाने (SIT) दिली आहे. बंगळुरुच्या कोर्टात SIT ने आरोपपत्र सादर केले. गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी दिवाणी आणि सत्र न्यायालयात 9 हजार 235 पानांचे आरोपपत्र दाखल केले.

सनातन संस्थेशी संबंधित असलेल्या नेटवर्कने गौरी लंकेश यांची हत्या केली. तसेच त्यांच्या हत्येचा कट पाच वर्षांपासून रचला जात होता, असेही या आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे.

गौरी लंकेश आणि त्यांची हत्या करणारा हल्लेखोर यांच्यात कोणतीही दुश्मनी नव्हती. गौरी लंकेश यांना फक्त यासाठी ठार करण्यात आले कारण त्या एका विशिष्ट विचारधारेचा आदर करत होत्या. तसेच सत्ताधाऱ्यांच्या आणि कट्टर धर्मीयांच्या विरोधात त्यांनी कायमच प्रखरपणे लिखाण केले. मात्र 5 सप्टेंबर 2017 ला त्यांची हत्या करण्यात आली.

नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, एम. एम. कलबुर्गी यांच्याप्रमाणेच गौरी लंकेश यांनाही ठार करण्यात आलं. चार हल्लेखोरांनी घरात घुसून गौरी लंकेश यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि त्यानंतर फरार झाले. या हत्येचा अनेक विचारवंतांनी निषेध केला होता.

कोण होत्या गौरी लंकेश ?
ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांची 5 सप्टेंबरला राहत्या घरी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यापैकी 3 गोळ्या त्यांच्या छातीत लागल्या, आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. बंगळुरुतल्या राजराजेश्वरीनगर परिसरात मंगळवार 5 सप्टेंबर रोजी ही धक्कादायक घटना घडली.

गौरी लंकेश ‘लंकेश पत्रिका’ या कन्नड साप्ताहिकाच्या त्या संपादिका होत्या. कर्नाटकातील सांप्रदायिकता आणि उजव्या विचारसरणीविरोधात त्यांनी आवाज उठवला होता. गौरी लंकेश या दिवंगत साहित्यिक पी लंकेश यांच्या कन्या होत्या.

गौरी यांच्याविरोधात मानहानीच्या दोन केसही दाखल करण्यात आल्या होत्या. धारवाडमधील भाजप खासदार प्रल्हाद जोशी आणि भाजप नेते उमेश दोषी यांनी गौरी लंकेश यांच्याविरुद्ध अब्रुनुकसानीचा आरोप केला होता. 2008 मध्ये छापलेल्या लेखात मानहानी केल्याप्रकरणी दोषी आढळल्याने त्यांना सहा महिन्यांचा कारावास आणि दहा हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. मात्र त्यांची जामिनावर मुक्तता झाली.