कर्णधार विराट कोहलीने आजच्या सामन्यात नाबाद 61 धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाने 165 धावांचे आव्हान दिल्यानंतर मैदानात उतरलेल्या भारताचे सलामीवीर शिखर धवन (41) आणि रोहित शर्मा (25) यांनी अर्धशतकी सलामी दिली. त्यानंतर कर्णधार विराट कोहलीच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाचे आव्हान पूर्ण केले. दिनेश कार्तिकने विराटला चांगली साथ दिली. कार्तिक (22) विराट कोहली (61) नाबाद राहिले.
त्याआधी, या सामन्यात ऑस्ट्रेलियाने वीस षटकांत सहा बाद 164 धावांची मजल मारली होती. कर्णधार अॅरॉन फिन्च आणि डी आर्सी शॉर्टने ६३ धावांची सलामी देऊन ऑस्ट्रेलियाच्या डावाचा भक्कम पाया रचला होता. परंतु डावखुरा स्पिनर कृणाल पंड्याने 36 धावांत चार फलंदाजांना माघारी धाडून ऑस्ट्रेलियाच्या डावाला ब्रेक्स लावले. त्यानंतर मार्कस स्टॉयनिस आणि नॅथन कल्टर नाईले याने सातव्या विकेटसाठी रचलेल्या 63 धावांच्या अभेद्य भागिदारीमुळे ऑस्ट्रेलियाला सहा बाद 164 धावांची मजल मारता आली.
सामन्याच्या सुरुवातीला भारतीय गोलंदाजांनी भेदक मारा करत टप्प्या टप्प्याने ऑस्ट्रेलियाचे फलंदाज माघारी धाडले. परंतु गचाळ क्षेत्ररक्षणाचा फटका भारताला बसला. त्यामुळे या लढतीत ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजी करताना 164 धावा करता आल्या.