मुंबई : मुंबईत आज विरोधक आणि वेगवेगळ्या 17 संघटनांच्या वतीनं संविधान बचाव रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. या रॅलीत राष्ट्रवादीचे आमदार अजित पवारांसह कन्हैयाकुमार, गुजरातचे आमदार जिग्नेश मेवानी, भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई, पाटीदार नेता हार्दिक पटेल, यांच्यासह अनेक जण रॅलीत सहभागी झाले आहेत. सरकारकडून होत असलेल्या संविधान बदलाच्या हालचाली व सरकारच्या अपयशी धोरणांमुळे ही रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे.


मंदिर महत्वाचं की शेतकऱ्यांच्या आत्महत्या? : हार्दिक पटेल

कार्यक्रमापूर्वीपाटीदार नेते हार्दिक पटेल यांनी उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावर टीका केली . मंदिर महत्वाचं की शेतकऱ्यांच्या आत्महत्या? असा प्रश्न हार्दिक पटेल यांनी उपस्थित केला. महाराष्ट्रात शेतकरी सरण रचून आत्महत्या करत आहे, मात्र उद्धव ठाकरे मंदिराचा मुद्दा घेऊन अयोध्या दौरा करत आहेत, अस हार्दिक पटेल म्हणाले.  अयोध्येत 144 कलम लागू करण्यात आलं आहे. मात्र 144 कलम लागू करुन सुद्धा शिवसेना, विश्व हिंदू परिषद आणि आरएसएसचे कार्यकर्ते इतक्या मोठ्या प्रमाणात आले कसे? आम्ही आंदोलन केलं की मोठ्या प्रमाणात सुरक्षा ठेवण्यात येते, अशा शब्दात हार्दिक पटेल यांने पोलीसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केला.

केंद्र सरकार सर्वोच्च न्यायालय, सीबीआय यासारख्या महत्वाच्या संस्थांवर वर्चस्व आणत आहे. त्यामुळे संविधान वाचवण्याची गरज निर्माण झाली असून त्यासाठी सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे, असं आवाहन हार्दिक पटेल यांनी केला.

मंदिरा ऐवजी रुग्णालय, शाळा बांधल्या का असा प्रश्न सरकारला विचारा : कन्हैया कुमार

अयोध्या हा आस्थेचा विषय आहे, यावर राजकारण करायला नको. मंदिर बांधले का? असा प्रश्न विचारु नका तर हॉस्पिटल, शाळा बांधल्या का? असा प्रश्न सरकारला विचारा. मंदिर हा प्रश्न नाहीच देशासमोर जे मुख्य प्रश्न आहेत, ते दुर्लक्षित केले जात आहे, असं कन्हैया कुमार म्हणाला

धर्म सकंटात नाही, ना मुस्लिम, ना हिंदू. कारण नसताना वातावरण तापवल जात आहे. मात्र संविधान संकटात आहे. सीबीआय, सर्वोच्च न्यायालय या संस्था संकटात आहेत. संघाला लोकशाही संपावायची आहे, म्हणून हे सगळ सुरु आसल्याचं कन्हैया कुमार म्हणाला.