IND vs AUS 2nd ODI: 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा दणदणीत पराभव केला. त्यामुळे टीम इंडियाची या मालिकेत 0-1 अशी पिछाडी झाली आहे. त्यामुळे आज टीम इंडियासाठी करो या मरोची स्थिती आहे. टीम इंडियाला मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी दुसऱ्या सामन्यात विजय मिळवणं बंधनकारक असणार आहे. दुसरा एकदिवसीय सामना आज सकाळी 9 वाजेपासून सिडनीत खेळण्यात येणार आहे.


सिडनीतल्या पहिल्याच वन डेत यजमान ऑस्ट्रेलियानं टीम इंडियाचा 66 धावांनी पराभव केला होता. ऑस्ट्रेलियानं दिलेल्या 375 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाला 50 षटकात आठ बाद 308 धावांचीच मजल मारता आली. भारताकडून हार्दिक पंड्यानं 90 आणि धवननं 74 धावांची खेळी करुन विजयासाठी संघर्ष केला. त्या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 128 धावांची भागीदारी रचली. पण जोश हेझलवूड आणि अॅडम झॅम्पाच्या प्रभावी माऱ्यासमोर त्यांचे प्रयत्न अपुरे ठरले.


पराभवानंतर कर्णधार विराट कोहलीनं फील्डर आणि गोलंदाजांना या पराभवासाठी जबाबदार धरत जाहीर नाराजी व्यक्त केली होती. सामन्यानंतर कोहली म्हणाला की, आम्हाला तयारीसाठी भरपूर वेळ मिळाला. आम्ही आतापर्यंत जास्त टी-20 खेळत होतो, बऱ्याच काळानंतर आम्ही एकदिवसीय सामना खेळलो, मात्र आम्ही वनडे सामने खूप जास्त खेळलो आहोत.


विराट म्हणाला की, 20-25 षटकानंतर आमची बॉडी लॅंग्वेज निराशाजनक होती. क्षेत्ररक्षणात चुका होत होत्या. असं असेल तर समोरच्या टीमकडून आपल्याला नुकसान होणारच आहे. समोरच्या फलंदाजांना दबावात आणायचं असेल तर आपल्याला विकेट्स घेणं, चांगलं क्षेत्ररक्षण करणं गरजेचं आहे, मात्र आम्ही असं करु शकलो नाहीत, असं विराट म्हणाला होता.

भारत प्लेइंग इलेव्हन
भारत: शिखर धवन, मयंक अग्रवाल, विराट कोहली (कप्तान), श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, नवदीप सैनी.


ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन
आरोन फिंच (कप्तान), डेविड वार्नर, स्टीव स्मिथ, मार्नस लाबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, कॅमरून ग्रीन, एलेक्स कॅरी, पॅट कमिंस, मिशेल स्टार्क, एडम झम्पा और जोश हेझलवुड