पुणे : एमएचटी-सीईटी 2020 परीक्षेचा निकाल रात्री 11 वाजता जाहीर करण्यात आला आहे. अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी अभ्यासक्रामांच्या प्रवेशांसाठी एमएचटी-सीईटी ही सामायिक प्रवेश परीक्षा यावर्षी ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली होती. एमएचटी-सीईटी परीक्षेत पीसीएम आणि पीसीबी पर्सेंटाईल गटात पुण्याच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली. निकाल विद्यार्थ्यांसाठी सीईटीच्या अधिकृत संकेतस्थळवर उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांना आपले निकाल mhtcet2020.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर पाहता येणार आहेत.
पीसीएम पर्सेंटाईल गटात पुणे जिल्ह्यातील सानिका गुमास्ते ही राज्यातून प्रथम आली आहे तर पीसीबी पर्सेंटाईल गटात पुण्याचा अनिश जगदाळे राज्यातून प्रथम आला आहे. पीसीएम गटात पुण्याचा सौरभ जोगचा दुसरा क्रमांक आला आहे तर अहमदनगरची वंशिता जैन या विद्यार्थिनीने तिसरा क्रमांक पटकावला आहे. पीसीबी पालघर जिल्ह्यातील वर्षा कुशवाह हिने दुसरा आणि नांदेड जिल्ह्यातील वेदांत जोशी याने तिसरा क्रमांक पटकावला आहे.
यंदा सीईटी सेलकडून पीसीएम व पीसीबी गटाच्या 100 पर्सेंटाइलच्या विद्यार्थ्यांची यादी जाहीर करण्यात आली असून यात मुंबई व पुण्याच्या विद्यार्थ्यांचा वरचष्मा दिसून आला. एमएचटी सीईटी परीक्षेसाठी राज्यातून 5 लाख 42 हजार 431 उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यातील 3 लाख 86 हजार 604 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. तर 1 लाख 55 हजार 827 विद्यार्थी यंदा परीक्षेला अनुपस्थित राहिले.