हैदराबाद : केदार जाधव आणि महेंद्रसिंग धोनीनं पाचव्या विकेटसाठी रचलेल्या 141 धावांच्या अभेद्य भागिदारीनं टीम इंडियाला हैदराबादच्या पहिल्या वन डेत सहा विकेट्सनी दणदणीत विजय मिळवून दिला. भारतानं या विजयासह पाच सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियावर 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
हैदराबादमधील सामन्यात विजयासाठी 237 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाची चार बाद 99 अशी बिकट अवस्था झाली होती. त्या परिस्थितीत धोनी आणि केदारनं पाचव्या विकेटसाठी 141 धावांची अभेद्य भागीदारी रचून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.
या भागिदारीत केदारचा वाटा हा 9 चौकार आणि एका षटकारासह नाबाद ८१ धावांचा होता. धोनीनं 6 चौकार आणि एका षटकारासह नाबाद 59 धावांची खेळी केली.
त्याआधी ऑस्ट्रेलियानं टीम इंडियाला विजयासाठी 237 धावांचं आव्हान दिलं होतं. सामन्यात भारतीय गोलंदाजांनी अचूक मारा करून ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना वेसण घातली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला 50 षटकांत सात बाद 236 धावांचीच मजल मारता आली.
सामन्यात उस्मान ख्वाजानं मार्कस स्टॉयनिसच्या साथीनं दुसऱ्या विकेटसाठी 20 षटकांत 87 धावांची भागीदारी रचली. पण ऑस्ट्रेलियाला त्या पायावर धावांचा डोंगर उभारता आला नाही. उस्मान ख्वाजानं 76 चेंडूंत पाच चौकार आणि एका षटकारासह 50 धावांची खेळी उभारली.
मार्कस स्टॉयनिसनं 53 चेंडूंत सहा चौकारांसह 37 धावांची खेळी केली. भारताकडून मोहम्मद शमी, जसप्रीत बुमरा आणि कुलदीप यादवनं प्रत्येकी दोन फलंदाजांना माघारी धाडलं.