हैदराबाद : भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमधल्या पाच वन डे सामन्यांच्या मालिकेतला सलामीचा सामना आज हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरॉन फिंचनं नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय स्वीकारला आहे. खेळाला सुरुवात झाली असून कर्णधार फिंच शून्यावर बाद झाला आहे.

इंग्लंडमधील आगामी विश्वचषकासाठी संघबांधणी करण्यासाठी या वन डेतही आपल्या संघनिवडीसाठी प्रयोग करण्याचा भारतीय संघव्यवस्थापनाचा प्रयत्न कायम राहिल. याच प्रयत्नात टीम इंडियाला ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांच्या मालिकेत 0-2 अशी लाजिरवाणी हार स्वीकारावी लागली होती. टी 20 चा पराभवाचा वचपा काढण्यासाठी टीम इंडिया सज्ज आहे.

भारतीय संघातल्या लोकेश राहुल, रिषभ पंत, विजय शंकर आणि सिद्धार्थ कौल या चार शिलेदारांसाठी ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका म्हणजे विश्वचषकाची चाचणी असेल. त्या चौघांपैकी दोघांचा भारताच्या विश्वचषक संघात समावेश होण्याची शक्यता आहे. विश्वचषक स्पर्धेसाठीची रंगीत तालीम समजल्या जाणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतही फलंदाजी आणि गोलंदाजीत प्रयोग केले जाणार आहेत.

कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी विश्वचषकाची संघबांधणी करण्यासाठी कंबर कसली असून शनिवारपासून हैदराबाद यथील राजीव गांधी स्टेडियमवर होणाऱ्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात चार खेळाडूंवर प्रामुख्याने लक्ष केंद्रित केले जाणार आहे. लोकेश राहुल, ऋषभ पंत, विजय शंकर आणि सिद्धार्थ कौल या चार खेळाडूंमध्ये विश्वचषकासाठीच्या संघात स्थान मिळवण्यासाठी चुरस  आहे.  राहुलने भारतीय संघात पुनरागमन करताना दोन ट्वेन्टी-20 सामन्यात उत्तम खेळी केल्याने त्याला संधी मिळण्याची शक्यता दाट आहे.

दुसरीतकडे गोलंदाज सिद्धार्थ कौलने संघात प्रवेश मिळवला आहे. तर खलिल अहमदला अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. विश्वचषकासाठी मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमरा यांचे स्थान निश्चित मानले जात आहे.