नवी दिल्ली: ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आणि सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक रिकी पाँटिंगने, भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियाचा कसोटी कर्णधार स्टीव्ह स्मिथ यांच्याबाबत वक्तव्य केलं आहे.

 

पाँटिंगच्या मते, "विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अजून आपल्या विरोधकांचा सामना करावा लागेल. पण यामध्ये ज्यांचे मनोबल अतिशय चांगले असेल त्यांचे करिअर उत्तम असेल".

 

एका कार्यक्रमानिमित्त भारत दौऱ्यावर आलेल्या रिकी पॉटिंगने आपले मत व्यक्त केले. सर्वोत्कृष्ट फलंदाजाची ही चर्चा अद्याप संपली नसल्याचेही तो यावेळी म्हणाला.

 

काही दिवसांपूर्वीच ऑस्ट्रेलियाचा माजी जलदगती गोलंदाज ब्रेट लीने नुकतेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराट कोहली सर्वोत्कृष्ट खेळाडू असल्याचे म्हटलं होतं. त्याबाबत पाँटिंगला विचारलं असता, त्याने ही प्रतिक्रिया दिली.

 

रिकी पॉटिंग यावेळी म्हणाला की, "खरंतर सर्वोत्कृष्ट फलंदाज कोण या प्रश्नामुळे मला काही फरक पडत नाही. मात्र, मला कोहली, स्मिथ, न्यूझीलंडचा फलंदाज केन विल्यमसन आणि इंग्लंडचा ज्यो रूट यांची खेळी पाहताना आनंद होतो. पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये काही असे खेळाडूही आहेत, जे यांना टक्कर देण्यासाठी संघर्ष करत आहेत".

 

पॉटिंग पुढे म्हणाला की, ''कोहलीचे वय कमी आहे. पण आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमधील त्याची आतापर्यंतची कामगिरी उत्कृष्ट आहे. त्याने आयपीएलच्या गेल्या पर्वातही चांगली कामगिरी केली. तो अतिशय उत्तम आणि कसलेला खेळाडू आहे. त्याला या कामगिरीत सातत्य राखत, भारतीय संघाचे नेतृत्व करताना संघाला यशाच्या शिखरावर पोहोचवायचे आहे.''

 

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कोहलीने कसोटी आणि वन डेत मिळून आजपर्यंत 37 शतकं ठोकली आहेत. तर रूट, स्मिथ आणि विल्यमसन यांच्या नावावर अनुक्रमे 18, 20 आणि 21 शतकांची नोंद आहे.

 

या चारही खेळाडूंनी समान कसोटी सामने खेळले असून, कोहलीने यांच्या तुलनेत सर्वाधिक एकदिवसीय क्रिकेट सामने खेळले आहेत. या एकदिवसीय सामन्यात कोहलीने उत्तम कामगिरी करत 25 शतकं झळकावली आहेत.

 

सचिन - कोहलीची तुलना  अयोग्य

दरम्यान, पॉटिंगला सचिन आणि विराटची तुलना होऊ शकते का असा प्रश्न विचारला असता. त्याने यावर अद्याप या दोघांची तुलना करणे म्हणजे घिसाडघाई ठरेल, असं पाँटिंग म्हणाला.

 

पाँटिंग म्हणाला, "विराट अजूनही तरुण आहे. त्याची आंतरराष्ट्रीय क्रिकेटची कारकिर्द अद्याप सुरु आहे. तर सचिनची कारकिर्द पूर्ण झाली आहे. खेळत असलेल्या विराटला बॅडपॅच येऊ शकतो. क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं. एखादेवेळी तो जखमीही होऊ शकतो. त्यामुळे त्याची सचिनशी तुलना न केलेलीच बरं होईल. सचिनने 200 कसोटी सामने खेळले आहेत. तर विराटने अद्याप 50 किंवा 60 च्या आसपासच कसोटी सामने खेळले आहेत. यामुळे यांच्यात ही तुलना करणे व्यर्थ आहे".