नवी दिल्ली : "गायींची तस्करी करणाऱ्यांना मारा, पण त्यांची हाडं मोडू नका, जेणेकरुन पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावं लागणार नाही," असा वादग्रस्त सल्ला विश्व हिंदू परिषदेने गोरक्षकांना दिला आहे.
या संदर्भात पश्चिम उत्तर प्रदेशातील ब्रज क्षेत्र आणि उत्तराखंडमधील वरिष्ठ गोरक्षांची बैठक झाली. यामध्ये गायींच्या तस्करांना मारा, पण मोडू नका, असा सल्ला गोरक्षांना देण्यात आला. 'टाइम्स ऑफ इंडिया'ने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.
सुत्रांच्या माहितीनुसार गोरक्षक विभागाच्या केंद्रीय समितीचे सदस्य खेमचंद यांनी गोरक्षासाठी काम करणाऱ्या, तसंच विहिंपचे सदस्य नसलेल्या स्वयंसेवकांची यादी बनवण्याचं आवाहन विहिंप कार्यकर्त्यांना केलं आहे. "देशाची रक्ष गोरक्षानेच होईल, मेक इन इंडियाने नाही," असंही ते म्हणाले.
तसंच काही लोक गायींच्या तस्करांना मारतानाचा व्हिडिओ व्हायरल करून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करतात. मात्र, त्याची काही गरज नाही, असे मत खेमचंद यांनी मांडलं.