दुबई: आशिया चषकात टीम इंडियाने पाकिस्तानचा तब्बल नऊ विकेट्सनी धुव्वा उडवला. सलामीवीर शिखर धवन आणि कर्णधार रोहित शर्मा यांच्या धडाकेबाज शतकाच्या जोरावर भारताने पाकिस्तानचं 238 धावांचं आव्हान सहज पार केलं.


 टीम इंडियानं 63 चेंडू आणि नऊ विकेट्स राखून विजयी लक्ष्य गाठलं. रोहित-शिखर या दोघांनी सलामीला 210 धावांची भागीदारी रचली. शिखर धवननं शंभर चेंडूंत 16  चौकार आणि दोन षटकारांसह 114 धावांची खेळी उभारली. त्याचं वन डे कारकीर्दीतलं हे पंधरावं शतक ठरलं. रोहित शर्मानं वन डे कारकीर्दीतलं एकोणिसावं शतक साजरं केलं. भारतीय कर्णधारानं 119  चेंडूंत सात चौकार आणि चार षटकारांसह नाबाद 111 धावांची खेळी उभारली.

धवन, थोडं थांबायलं हवं होतंस!

टीम इंडियाचा सलामीवीर शिखर धवन आशिया चषकात जबरदस्त फॉर्मात आहे. त्यानं पाकिस्तानविरुद्धच्या  कालच्या सुपर फोर सामन्यात 16 चौकार आणि दोन षटकारांसह 114 धावांची खेळी उभारली. धवनचं यंदाच्या आशिया चषकातलं हे दुसरं शतक ठरलं. त्यानं चार सामन्यांमध्ये मिळून 81.75 च्या सरासरीनं 327 धावांचा रतीब घातला आहे.

धवन आणि रोहित शर्माची जबरदस्त फलंदाजी सुरु होती. त्यामुळे ही जोडीच भारताला विजय मिळवून देणार हे जवळपास निश्चित होतं. पाकिस्तानची गोलंदाजीही बोथट झाली होती. त्यामुळे या दोघांची विकेट पडणं शक्य नव्हतं. मात्र शिखर धवनने थोडी घाई केली आणि स्वत:चा घात करुन घेतला. एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न धवनने केला आणि तो बाद झाला.

पाकिस्तानच्या शोएब मलिकच्या गोलंदाजीवर रोहित शर्माने चेंडू खेळून काढला. चेंडू बॅटला लागून थोड्या अंतरावर गेला होता. नॉन स्ट्राईकर एंडला उभा असलेल्या शिखर धवनने धाव घेण्याच प्रयत्न केला. मात्र रोहितने त्याला कोणताही सिग्नल दिला नव्हता. रोहित त्याला थांबण्याचा इशारा देत होता, मात्र धवन तोपर्यंत अर्ध्यापेक्षा पुढे आला होता.

रोहितने त्याला माघारी धाडलं असता, धवन क्रीजमध्ये पोहोचेपर्यंत कव्हरला उभा असलेल्या हसन अलीने शोएब मलिकच्या हाती चेंडू फेकला आणि धवन धावबाद झाला.

धवन बाद झाला त्यावेळी त्याच्या नावावर 114 जमा झाल्या होत्या, तर रोहित शर्मा नाबाद 95 धावांवर खेळत होता. भारत विजयाजवळ पोहोचला होता. भारताला 100 चेंडूत केवळ 28 धावा हव्या होत्या. त्यामुळे धवनने जर गडबड केली नसती, तर रोहित-धवन या दोघांनीच पाकिस्तानला लोळवलं असतं. अंबाती रायुडूला मैदानात उतरावंच लागलं नसतं. संपूर्ण देशाची हीच भावना होती की धवन, थोडं थांबायला हवं होतंस.

दरम्यान, धवन बाद झाल्यानंतर रोहित शर्माने रायुडूच्या साथीने विजयाची औपचारिकता पार केली. रोहित शर्माने नाबाद 111 आणि रायुडूने नाबाद 12 धावा केल्या.