कुंबळेसारख्या प्रशिक्षकाला विरोध करणाऱ्या खेळाडूला हाकला: गावसकर

Continues below advertisement
मुंबई: अनिल कुंबळेसारख्या कडक शिस्तीच्या पण रिझल्ट देणाऱ्या प्रशिक्षकाला जो कोणी विरोध करतोय, त्याची टीममधून हकालपट्टी करा, असा आक्रमक पवित्रा घेत टीम इंडियाचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी थेट विराट कोहलीवर निशाणा साधला आहे. टीम इंडियाचे प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी करार वाढवण्यास नकार देत, पदावरुन पायउतार होणं पसंत केलं. मात्र आपल्या राजीनामा पत्रात त्यांनी कर्णधार विराट कोहलीकडे बोट ठेवलं. टीम इंडियाच्या कर्णधाराला माझ्या प्रशिक्षकपदावर आक्षेप असल्याचा आरोप त्यांनी पायउतार होताना केला आहे. यानंतर आता टीम इंडियाचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी कुंबळेची बाजू घेतली आहे. "तुम्हाला सरावात सूट देणारा, सुट्टी देणारा, शॉपिंगला जाऊ देणारा प्रशिक्षक हवा आहे" असा टोला सुनील गावसकर यांनी लगावला. इतकंच नाही तर अनिल कुंबळेसारखा रिझल्ट देणारा, कडक शिस्तीचा प्रशिक्षक ज्याला नको आहे, त्या खेळाडूला संघातून हाकलायला हवं, असा आक्रमक पवित्राही गावसकर यांनी केली. गावसकर म्हणाले "तुम्हाला सूट देणारा प्रशिक्षक हवा. तुम्हाला सराव करावा वाटत नसेल तर ठीक आहे, तुम्ही शॉपिंगला जा. सुट्टी घ्या, मजा करा, असं म्हणणारा प्रशिक्षक हवा. जर कुंबळेसारखा कडक शिस्तीचा मास्तर असेल आणि ज्याने वर्षभरात संघाची कामगिरी सुधारली असेल, अशा प्रशिक्षकाविरोधात ज्याची तक्रार आहे, अशा किरकिरी खेळाडूला संघातून हाकला" प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर कुंबळेने गेल्या वर्षभरात टीम इंडियाला भरभरुन दिलं. संघाची कामगिरी निश्चितच उत्तम झाली आहे, असं गावसकरांनी नमूद केलं. कुंबळेच्या राजीनाम्यामुळे भविष्यातील प्रशिक्षकाने कसं वागावं याबाबतचे संकेत दिले आहेत. तुम्हाला खेळाडूंची मर्जी राखून त्यांच्यासमोर झुकावं तर लागेल किंवा कुंबळेसारखं ताट मानेने राजीनामा तरी फेकावा लागेल, असं या प्रकरणावरुन दिसतंय, असंही गावसकर म्हणाले. कुंबळेच्या राजीनाम्यामुळे विराट कोहलीने एक नकारात्मक संदेश दिल्याचंही गावसकरांनी नमूद केलं. गावसकर म्हणाले, "जर क्रिकेट सल्लागार समिती कुंबळेसाठी सकारात्मक होती, तेव्हा मलाही वाटलं की कुंबळे करार कायम ठेवेल. पण कोहली-कुंबळेमध्ये वाद असल्याची थोडीशी शंकाही होती. पण जो काही वाद असेल, त्याचा शेवट असा होणं हे भारतीय क्रिकेटसाठी अत्यंत दुर्दैवी आहे". दोन-तीन लोक किंवा त्यापेक्षा जास्त जण एकत्र आल्यानंतर मतभेद होणं साहजिक आहे. तणावाच्या स्थितीत हे जास्त होतं. मात्र कुंबळेच्या नेतृत्त्वात भारतीय संघाची कामगिरी अत्यंत चांगली होती. कुंबेळने गेल्या वर्षभरात वाईट काही केलंय असं मला तरी वाटत नाही. मात्र अशाप्रकारचा दिवस भारतीय क्रिकेटमध्ये येणं हे त्या ग्रुपमध्ये किंवा भारतीय संघात काही आलबेल नसल्याचं दिसून येतंय, असंही त्यांनी नमूद केलं. संबंधित बातम्या अनिल कुंबळेचं राजीनामा पत्र जसंच्या तसं  कोहलीला माझ्या प्रशिक्षकपदावर आक्षेप : अनिल कुंबळे  युवराज आणि धोनीबाबत निर्णय घेण्याची वेळ : राहुल द्रविड 
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola